पीटीआय, नवी दिल्ली
तमिळनाडूच्या करुर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन करावी, या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला ‘तमिळगा व्हेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. २७ सप्टेंबरला झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला होता आणि ६० जण जखमी झाले होते.

‘टीव्हीके’चे सचिव आधव अर्जुन यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. केवळ तमिळनाडूच्याच अधिकाऱ्यांचा समावेश असलेली ‘एसआयटी’ स्थापन करण्यास पक्षाने विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र तपास यंत्रणेकडून या चेंगराचेंगरीचा न्याय्य आणि निष्पक्ष तपास केला जावा, अशी ‘टीव्हीके’ची मागणी आहे. काही समाजकंटकांनी पूर्वनियोजित कट रचून चेंगराचेंगरी घडवल्याची शक्यता आहे, असा दावा ‘टीव्हीके’ने केला आहे. तसेच ‘एसआयटी’ स्थापनेचा आदेश देताना मद्रास उच्च न्यायालयाने पक्ष आणि पक्षाचे नेते विजय यांच्यावर कठोर टिप्पणी केली होती. त्यालाही ‘टीव्हीके’ने आक्षेप घेतला आहे.

सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या याचिकेची नोंद घेतली आणि शुक्रवारी सुनावणी घेण्याचे मान्य केले. करुर चेंगराचेंगरीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांबरोबरच ‘टीव्हीके’च्या याचिकेवर सुनावणी होईल.

भाजपकडून सीबीआय चौकशीची मागणी

तमिळनाडू भाजपच्या विधि विभागाचे उपाध्यक्ष जी एस मणी यांनी चेंगराचेंगरीप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल केली. तमिळनाडू पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्या निकालाला भाजपच्या नेत्या उमा आनंदन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरही शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

करुर भेटीच्या परवानगीची मागणी

चेन्नई : ‘टीव्हीके’चे नेते आणि अभिनेते विजय यांना चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी करुर येथे जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पक्षातर्फे बुधवारी राज्य पोलिसांकडे करण्यात आली. पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलीस महासंचालक जी वेंकटरामण यांची भेट घेऊन ही मागणी केली. विजय यांनी सोमवारी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवरून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना सर्व साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.