गेल्या काही दिवसांत काश्मीर खोऱ्यात जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वादग्रस्त पेलेट गन्सऐवजी आता मिरचीची पूड असलेल्या पावा शेल्सच्या वापराला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजूरी दिली आहे. काश्मीरमधील सर्वपक्षीय बैठकीसाठी आगामी काही दिवसांत राजनाथ सिंह काश्मीर खोऱ्यात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. पावा शेल्स पेलेट गन्सपेक्षा कमी जीवघेण्या आहेत. एखाद्यावर पावा शेल्सचा वापर केल्यास संबंधित व्यक्ती काही काळासाठी दुर्बल होते आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. पावा शेल्समध्ये मिरचीतील सेंद्रीय घटकांचे मिश्रण असते.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर हिंसाचार उसळला होता. यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कराकडून पेलेट गन्सचा मोठ्याप्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्यामुळे अनेक तरूण गंभीर जखमी झाले होते, तसेच अनेकांवर दृष्टी कायमची गमावण्याची वेळ आली होती. त्यामुळे मानवधिकार संघटनांसह अनेकांकडून पेलेट गन्सचा वापर रोखण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने पेलेट गन्सला पर्यायी मार्ग शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.
गेल्या ५७ दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षांत फार मोठय़ा प्रमाणावर लोकांना जखमी करणाऱ्या छऱ्याच्या बंदुकांना (पेलेट गन्स) पर्याय शोधला जाईल, असे आश्वासन देऊन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मिरी लोकांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला होता. ‘इन्सानियत, जम्हूरियत व काश्मिरियत’ यांच्या परिघात जम्मू- काश्मीरला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत कुणाशीही बोलण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते.