RCB vs CSK, Ayush Mhatre Batting: चेन्नई सुपर किंग्जचा १७ वर्षांचा फलंदाज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील अनुभवी गोलंदाजांवर भारी पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात चेन्नईचा संघ २१४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे चेन्नईला दमदार सूरूवात हवी होती. ही सुरूवात आयुष म्हात्रेने करून दिली. सलामीला फलंदाजी करताना आयुषने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान त्याने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या एकाच षटकात २६ धावा कुटल्या.
भुवनेश्वर कुमार या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर आयुषने अनुभवी गोलंदाजाला कुठलाही मानपान न देता चौकार खेचला. तो इथेच थांबला नाही, तर पुढील २ चेंडूंवर लागोपाठ २ चौकार खेचले. षटकातील चौथा चेंडू त्याने सीमारेषेपार पोहोचवला. आधी सलग ३ चौकार आणि मग षटकार खेचल्यानंतर आयुषने शेवटच्या २ चेंडूंवर लागोपाठ २ चौकार खेचले. यासह ५ चौकार आणि १ षटकारासह आयुषने भुवनेश्वर कुमारच्या षटकात २६ धावा वसूल केल्या.
भुवनेश्वर कुमार हा अनुभवी गोलंदाज आहे. पण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलं असावं. आयुषने चांगले चेंडूही सीमारेषेपार पोहोचवले. यादरम्यान आयुषने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं.
यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो आयपीएल स्पर्धेत अर्धशतक झळकावणारा तिसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. या यादीत राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. वैभवने वयाच्या १४ व्या वर्षी अर्धशतक झळकावलं. या यादीत रियान पराग दुसऱ्या स्थानी आहे. रियानने वयाच्या १७ व्या वर्षी अर्धशतक पूर्ण केलं होतं.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर जेकब बेथेलने ५५ आणि रोमारियो शेफर्डने नाबाद ५३ धावा केल्या. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी २१४ धावांचे आव्हान ठेवले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयुष म्हात्रेने सर्वाधिक ९४ धावा केल्या. तर रविंद्र जडेजाने नाबाद ७७ धावा केल्या. मात्र चेन्नईचा संघ दिलेलं आव्हान गाठण्यात अपयशी ठरला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २ धावांनी आपल्या नावावर केला.