पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात शनिवारी आणखी एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील चौधरी गुंड भागात पूरन कृष्ण यांच्यावर त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आला. त्यांना तातडीने शोपियाँ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू होती.

बांदिपुरा जिल्ह्यात स्फोटके जप्त

जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शनिवारी स्फोटक (आयईडी) जप्त केले. अधिकाऱ्यांनी सांगितले, की हे अत्याधुनिक स्फोटक सुमारे १६ किलो वजनाचे होते. पोलीस व लष्कराच्या संयुक्त पथकाने उत्तर काश्मीर जिल्ह्यातील अस्तांगो भागात हे स्फोटक जप्त केले. ते निकामी करण्यासाठी संबंधित पथकाला पाचारण केले होते.

देशद्रोही कारवायांबद्दल पाच कर्मचारी बडतर्फ

जम्मू  : जम्मू-काश्मीर प्रशासनाने शनिवारी एक पोलीस कर्मचारी आणि बँक व्यवस्थापकासह पाच सरकारी कर्मचाऱ्यांना देशद्रोही कारवायांत सहभागी असल्याबद्दल सेवेतून बडतर्फ केले. एका अधिकाऱ्याने सांगितले, की घटनेच्या अनुच्छेद ३११ नुसार पाच कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा अधिकारी म्हणाला, की या कर्मचाऱ्यांच्या संशयास्पद हालचाली सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांच्या निदर्शनास आल्या होत्या. राज्य आणि देशाचे हित, सुरक्षेस बाधक कृत्यांत त्यांचा सहभाग आढळला. बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांत बारामुल्ला मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अश्फाक अहमद वनी, पोलीस हवालदार तन्वीर सलीम दर, ग्रामीण भागातील कर्मचारी सय्यद इफ्तिखार अंद्राबी, बारामुल्लाच्या जलशक्ती विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहाय्यक सुरक्षारक्षक इर्शाद अहमद खान आणि बारामुल्लातील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या हंदवाडा उपमंडलातील साहाय्यक कर्मचारी अब्दुल मोमीन पीर यांचा समावेश आहे.