तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या फार्महाऊसवर असताना स्नानगृहात पाय घसरुन पडल्याने त्यांना सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री उशिरा इरावल्लीतल्या त्यांच्या फार्महाऊसमधल्या स्नानगृहात ते पाय घसरुन पडले. त्यामुळे त्यांच्या कंबरेला, माकडहाडाला आणि पायाला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे आज त्यांच्यावर हिप रिप्लेसमेंट सर्जरी (खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया) करण्यात आली. केसीआर यांची प्रकृती आता स्थिर असून ते वॉकरच्या सहाय्याने चालू लागले आहेत.

केसीआर हे शस्त्रक्रियेनंतर वॉकरच्या सहाय्याने चालू लागल्याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. रुग्णालयातील रुग्णांचे कपडे परिधान केलेल्या आणि वॉकरच्या सहाय्याने चालणाऱ्या केसीआर यांना प्रथमदर्शनी ओळखणं कठीण झालं आहे. हिप रिप्लेसमेंट सर्जरी ही माकडहाड आणि मांडीच्या हाडाच्या जोडणीशी संबंधित असते. माकडहाड किंवा मांडी नव्हे तर या दोन हाडांना जोडणाऱ्या भागाची शस्त्रक्रिया केली जाते. हा तोच भाग आहे ज्यामुळे माणूस दोन पायांवर उभा राहू शकतो, चालू शकतो.

दरम्यान, बीआरएस नेते दासोजू श्रवण यांनी माध्यमांना सांगितले की, केसीआर यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ते आता पूर्णपणे बरे आहेत. आम्हाला आशा आहे की, येत्या तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. केसीआर यांच्यावरील शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली. तेलंगणातील ४ कोटी जनतेचा आशीर्वाद आणि ईश्वराच्या कृपेने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून ते आता लवकरच लोकांमध्ये मिसळतील.

हे ही वाचा >> राजस्थानला ‘योगी’ मिळणार नाहीत? मुख्यमंत्रिपदाबाबत बालकनाथ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “मला पंतप्रधानांच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केसीआर यांना हिप फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तसंच त्यांच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाल्याचंही सांगितलं होतं. केसीआर हे गुरुवारी (७ डिसेंबर) त्यांच्या फार्महाऊसवर गेले होते. तिथे स्नानगृहात त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. त्यामुळे त्यांच्या खुब्याचं हाड मोडलं होतं. त्यांचा पायालाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते वॉकरच्या सहाय्याने चालू लागले आहेत.