गोविंदवाडी रस्त्यावरील अतिक्रमणे तोडली; तबेले मालकाला पर्यायी जागा देणार
कल्याणमधील रखडलेल्या गोविंदवाडी रस्त्याला बाधित होणारी अतिक्रमणे सलग तीन दिवस कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तबेला मालकाला पर्यायी जागा देऊन तातडीने तबेल्याचा अडथळा काढण्याच्या जोरदार हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
गेल्या सहा वर्षांपासून गोविंदवाडी रस्ता एक तबेला मालक पालिकेला जागा देण्यास तयार नसल्याने रखडला आहे. तसेच तबेल्यावर कारवाई करण्यास न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. त्यामुळे पालिकेची कारवाई करताना अडचण होत आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तबेले मालकाला पर्यायी जागा देण्याची तयारी केली आहे. सार्वजनिक हितासाठीचा रस्ता केवळ एका तबेल्यामुळे रखडला आहे, ही बाबही पालिकेने न्यायालयाच्या निदर्शनास आणली आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भूखंडाची अधिकारी चाचपणी करीत आहेत. हा भूखंड तबेले मालकाला देता येईल, याचा अधिकारी विचार करीत आहेत.
गेल्या आठवडय़ात दोन दिवस गोविंदवाडी रस्त्यावरील तबेल्याच्या परिसरात असलेली पक्की, कच्ची सुमारे २० ते २५ बांधकामे क प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. अतिक्रमणे काढलेल्या रस्त्यावर पालिकेने ती पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात जाऊ नये, म्हणून त्या जागेवर कच्चा रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता येत्या महिनाभरात पूर्ण झाला पाहिजे, असा चंग आयुक्तांनी बांधला आहे.
भ्रमणध्वनी थांबले
तबेले मालक, न्यायालय, पोलिसांशी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे सतत संपर्क करून या रस्ते कामाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या सात वर्षांपासून रखडलेला रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आयुक्त रवींद्रन यांनी पुढाकार घेतला आहे. आयुक्तांच्या कणखर भूमिकेमुळे कोणीही राजकीय नेता गोविंदवाडी रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम थांबविण्याची हिंमत करीत नाही. यापूर्वी पालिका अधिकारी गोविंदवाडी रस्त्याच्या ठिकाणी फिरकले तरी नवी मुंबईतून अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी सुरू व्हायचे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.