शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या स्वराज अभियानच्या योगेंद्र यादव आणि त्यांच्या ८५ स्वयंसेवकांना मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे यादव यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. यादव यांच्यावर करण्यात आलेली कारवाई क्रूरपणाची होती, असे मत व्यक्त करून केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
केजरीवाल आणि यादव यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेला वाद अद्यापही ताजा असतानाच केजरीवाल हे यादव यांच्या समर्थनासाठी सरसावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी हे प्रकरण हाताळले ते निषेधार्ह आहे, असे केजरीवाल म्हणाले. यादव यांना सकाळी ८५ स्वयंसेवकांसह अटक करण्यात आली. रेसकोर्स येथे मेळावा घेण्याची त्यांची योजना होती. केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ यादव यांनी आंदोलन पुकारले आहे.