Vice President Election : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता या पदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) व इंडिया आघाडीने आपापले उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांशिवाय एकूण ६८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी केवळ दोनच उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या नामांकन अर्जांच्या पडताळणीदरम्यान काही बोगस अर्ज देखील आढळले आहेत.
केरळमधील जेकब जोसेफ नावाच्या एका व्यक्तीने बोगस अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यासाठी त्याने खासदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचं देखील पडताळणीदरम्यान उघडकीस आलं आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट ही होती. या तारखेपर्यंत ४६ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी १९ उमेदवारांचे २८ अर्ज सुरुवातीलाच फेटाळण्यात आले होते. उर्वरित २७ उमेदवारांच्या ४० अर्जांची २२ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली.
राधाकृष्णन व रेड्डी यांचे प्रत्येकी चार अर्ज
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी केवळ दोनच अर्ज वैध ठरले आहेत. हे दोन अर्ज एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि ‘इंडिया’चे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचे आहेत. या दोघांनी प्रत्येकी चार उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
२२ खासदारांच्या स्वाक्षऱ्या पाहून अधिकाऱ्यांना आला संशय
या अर्जांपैकी जेकब जोसेफ याचा अर्ज पाहून पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. कारण, उपराष्ट्रपतिपदासाठी त्याचं नाव सुचवणाऱ्या २२ (proposers) खासदारांची नावं व स्वाक्षऱ्या या अर्जात होत्या. तसेच २२ समर्थक खासदारांच्या स्वाक्षऱ्या देखील होत्या. यामध्ये लोकसभा व राज्यसभेतील खासदारांचा समावेश आहे.
अर्जात तुरुंगात असलेल्या खासदाराची देखील स्वाक्षरी
जेकबचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. कारण, त्याने कुठल्याही खासदाराच्या परवानगीशिवाय त्याच्या अर्जात खासदारांची नावं नमूद केली होती आणि त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या. अर्जाची पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जेकबच्या अर्जात नमूद केलेल्या खासदारांशी संपर्क करून त्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की त्यांनी कुठल्याही जेकब जोसेफ नावाच्या व्यक्तीच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी केलेली नाही. विशेष म्हणजे जेकबच्या अर्जात वायएसआर काँग्रेसचे खासदार मिथून रेड्डी यांचं नाव व स्वाक्षरी देखील पाहायला मिळाली. रेड्डी हे सध्या तुरुंगात आहेत.