Kerala Mass Muder Crime News : केरळच्या तिरुअनंतपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २३ वर्षीय तरुणाने त्याची आजी, भाऊ आणि प्रेयसीसह एकूण सहा जणांची हत्या केल्याचा पोलिसांसमोर कबुलीजबाब दिला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. सोमवारी सायंकाळी काही तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी या हत्याकांडाच्या घटना घडल्या. हत्या केल्यानंतर आरोपी अफान याने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आखाती देशांत अफानच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. हा व्यवसाय डबघाईला आल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर तयार झाला होता. त्यातच त्याला आखाती देश सोडून भारतात परतावं लागलं होतं. दरम्यान, त्याच्या माहितीवर संपूर्णपणे अवलंबून न राहता पोलिसांनी अधिक चौकशी व तपास सुरू केला आहे. अफानचा मोबाईल जप्त केला असून त्याचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. तसंच, त्याला ड्रग्सचं व्यसन आहे का हेही तपासलं जात आहे. अफानने सहा हत्या केल्याचा दावा केला असला तरी त्यापैकी एक व्यक्ती अद्याप मृत्यूशी झुंजत आहे. अफानच्या आईला जखमी अवस्थेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यामुळे अफानने एकूण पाच खून केले आहेत.

अफान २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता त्याच्या घरून निघाला. घरापासून २५ किलोमीटर अंतरावर त्याची आजी सलमा बीबी राहत होती. आजीच्या घऱी जाऊन त्याने हातोडीने आजीचं डोकं फोडलं आणि तिला ठार केलं. त्यानंतर त्याने हातोडी स्वच्छ केली व तिथून बाहेर पडला. तिथून तो त्याच्या काकाच्या घरी गेला. आजीच्या घरापासून पाच किमी अंतरावर त्याचे काका लतीफ राहत होते. काका समोर दिसताच अफानने खिशातली हातोडी काढली व त्यांचं डोकं फोडलं. त्यानंतर त्याने त्याची काकी सजिदाच्या डोक्यावर हातोडीने अनेक घाव घातले. दोघेही मृत्यूमुखी पडले आहेत याची खात्री करून आणि हातोडी स्वच्छ करून तो काकाच्या घरातून बाहेर पडला.

आजी व काका-काकीनंतर भाऊ व प्रेयसीची हत्या

काका-काकीला ठार करून अफान स्वतःच्या घरी परतला. घरात त्याची पहिली भेट धाकटा भाऊ एहसानशी झाली. त्याने परत खिशातली हातोडी काढली आणि १३ वर्षीय एहसानच्या डोक्यात पहिला घाव घातला. त्यानंतर एहसान मरेपर्यंत अफान हातोडीचे घाव घालत होता. त्यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन त्याने आईचं डोकं फोडलं. आई शाहिदाच्या डोक्यात काही घाव घातल्यानंतर त्याला वाटलं की ती देखील मरण पावली आहे. त्यानंतर तो खाली आला. त्याने त्याची प्रेयसी फरशाना हिला बोलावून घेतलं. फरशाना शेजारच्याच घरात राहत होती. फरशाना घरी आल्यावर तो तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यानंतर अफानने हातोडीने फरशानाचं डोकं फोडलं. तिच्या डोक्यात काही घाव घालून तिला ठार केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफानचा आत्महत्येचा प्रयत्न

फरशानाला ठार मारल्यानंतर अफान काही वेळाने घरातून बाहेर पडला आणि त्याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांना हत्याकांडाची माहिती दिल्यानंतर त्याने उंदिर मारण्याचं औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत.