सोमवारी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा परिणाम अमेरिकेतील सौर ऊर्जानिर्मितीवर पडला. त्या काळात ऊर्जेचा तुटवडा भरून काढण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेत वीज कंपन्यांचे व घरगुती मिळून सुमारे ४०,००० मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. या ग्रहण काळात अमेरिकेत सुमारे ९००० मेगावॅट सौर ऊर्जेची टंचाई निर्माण झाली. चौदापैकी कॅलिफोर्निया व उत्तर करोलिना या दोन राज्यांत ऊर्जेची टंचाई जास्त जाणवली. कॅलिफोर्नियाची सुमारे ४० टक्के विजेची गरज ही सौर ऊर्जेने भागविली जाते. ग्रहण काळात ४२०० मेगावॅट सौर ऊर्जा उपलब्ध नव्हती, तर उत्तर करोलिनामध्ये ३००० मेगावॅटहून अधिक सौर ऊर्जा प्रकल्प आहेत. ग्रहण सुरू होताच सुमारे ७० मेगावॅट प्रति मिनिट या दराने विद्युतनिर्मितीत घट होऊ  लागली. नॉर्थ अमेरिकन इलेक्ट्रिक रिलाएबिलिटी कॉपरेरेशनने संबंधितांना या ऊर्जा समस्येवर तोडगा काढण्याबद्दल सुचविले होते. सन २०१५ मध्ये युरोपमध्ये सूर्यग्रहण झाले होते. कॅलिफोर्नियाप्रमाणेच जर्मनीत सौर ऊर्जेचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो.  त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या विद्युत संचालन संस्थेने जर्मनीतील संबंधितांशी सल्लामसलत केली होती. यंदा जलविद्युत प्रकल्पासाठी जलसाठा समाधानकारक असल्याने त्यातून ग्रहण काळात जादा वीजनिर्मिती करण्याचे योजले होते. तसेच शासकीय आयोगाने नागरिकांना ग्रहण काळात दोन-तीन तासांत उपकरणे बंद ठेवून वीज बचतीचे आवाहन केले होते. उत्तर करोलिनामध्ये डय़ूक एनर्जीने नैसर्गिक वायूचे इंधन वापरून अतिरिक्त निर्मिती करण्याचे योजले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khagras grahan effect on solar power generation in america
First published on: 22-08-2017 at 03:11 IST