Khan Sir Got Married : लोकप्रिय शिक्षक तथा युट्यूबर खान सर यांचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. खरं तर खान सर हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. एवढंच नाही तर खान सरांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी खान सरांनी त्यांचं लग्न झाल्याचं वर्गातच सांगितलं होतं. छोटेखानी कार्यक्रमात आपलं लग्न झाल्याचं खान सरांनी म्हटलं होतं. दरम्यान, त्यानंतर काही दिवसांनी खान सरांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडला होता. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावल्याचंही पाहायला मिळालं.
लग्नाच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमानंतर खान सर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. ट्रोल होण्यामागचं कारण म्हणज लग्नाच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात खान सरांच्या पत्नीने चेहरा पदराने झाकला होता. यावरून खान सरांना अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र, यावर आता खुद्द खान सरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पत्नीने चेहरा पदराने का झाकला होता? याबाबत खान सरांनी सांगितलं की, रिसेप्शनमध्ये चेहरा पदराने झाकण्याचा निर्णय हा माझ्या पत्नीचा होता, असं त्यांनी म्हटलं आहे. एएनआयच्या पॉडकास्टमध्ये खान सरांनी हे स्पष्टीकरण दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
खान सर काय म्हणाले?
“प्रत्येक मुलीचं वेगळं स्वप्न असतं. लोकांच्या गर्दीत वधूची एक वेगळी ओळख असते. पण माझ्या पत्नीने रिसेप्शनमध्ये चेहरा झाकण्याचा निर्णय तिचा स्वत:चा होता. याबाबत पत्नीने सांगितलं की तिला इतरांपेक्षा वेगळं दिसायचं होतं. मी तिला सांगितलं की लोक यासाठी मला दोष देतील. पण तिने आग्रह धरला की हे तिचं बालपणीचं स्वप्न आहे. मी तिला कारण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती ठाम होती आणि शेवटी मी होकार दिला, असं खान सर म्हणाले आहेत.
छोटेखानी कार्यक्रमात झालं लग्न
खान सरांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या वर्गातच लग्नाची घोषणा केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विवाह छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याआधीच लग्नाची तारीख निश्चित झाली होती. पण ऑपरेशन सिंदूरदरम्यान तणाव अधिकच वाढला होता. त्यामुळे कुणालाही लग्नासाठी आमंत्रित न करण्याचं व मोठा कार्यक्रम न करण्याचं ठरवल्याचं खान सरांनी नमूद सांगितलं होतं.
कोण आहेत खान सर?
खान सर लोकप्रिय शिक्षक आहेत, तसेच युट्यूबर देखील आहेत. खान सर हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. खान जीएस रिसर्च सेंटर व एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खान सर वेगवेगळ्या विषयाचे वर्ग घेतात. अत्यंत क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्यात ते वाकबगार असल्याचं त्यांच्याबाबत बोललं जातं. शिकवण्याच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.