Kia India Theft Of 1008 Engines: दक्षिण कोरियाची कंपनी किआ मोटर्सच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी भंगार विक्रेत्यांशी संगनमत करून गेल्या ३ वर्षात कंपनीच्या कारखान्यातून १,००८ इंजिन चोरल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. चोरी झालेल्या इंजिनची किंमत २.३ दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.
पोलीस तपास कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, किआ इंडियाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांवर भंगार विक्रेत्यांसोबत मिळून किआच्या कारखान्यातून ३ वर्षात १,००८ इंजिन चोरण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. चोरी झालेली ही इंजिने २.३ दशलक्ष डॉलर्सची होती. याचबरोबर पोलीस तपासात असे आढळून आले की, या प्रकरणामुळे कंपनीचे औद्योगिक कामकाज, भागधारकांचा विश्वास आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे.
मार्चमध्ये किआने आंध्र प्रदेश पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, अंतर्गत नोंदींनुसार त्यांनी सहकारी कार उत्पादक कंपनी हुंडईकडून घेतलेली इंजिन गहाळ असल्याचे आढळून आले आहे. त्यांना या प्रकारामागे माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय होता.
१६ एप्रिलच्या पोलीस अहवालात म्हटले आहे की, कंपनी सोडलेल्या एका टीम लीडर आणि कंपनीत काम करत असलेल्या इंजिन विभागाच्या एका सेक्शन हेडने बनावट पावत्या आणि गेट पास वापरून इंजिनची परदेशात तस्करी केली. यामध्ये ज्या इतर दोघांचा समावेश आहे त्यांनी चोरीचे इंजिन वाहतुकीची व्यवस्था केली होती, तसेच यामध्ये दोन स्क्रॅप डीलर्सचाही सहभाग होता ज्यांनी इंजिन दिल्लीत विकले होते.
तपास अधिकारी निरीक्षक के. राघवन यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात बनावट नोंदणी क्रमांक असलेले अनेक ट्रक वापरण्यात आले असून, बेकायदेशीर व्यवहार सतत केले जात होते. किआ इंडियाने माध्यमांना सांगितले की, गेल्या वर्षी ही तफावत उघडकीस आली तेव्हा त्यांनी त्यांची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम अपग्रेड केली होती. कंपनीने स्वतः अंतर्गत चौकशी केली, नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणातील एक आरोपी, विनायगामूर्ती वेलुचामी (३७), जो इंजिन डिस्पॅच विभागाचा प्रमुख होता, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, निर्दोष असल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या आरोपीचे नाव पट्टन सलीम (३३) आहे, तो २०२० पासून कंपनीत टीम लीडर म्हणून काम करत आहे.