लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपा आणि एएआयएडीएमेला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही पक्षांना यंदा तामिळनाडूमध्ये खातेही उघडता आलेले नाही. या निकालाची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, या निकालावरून आता दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचेही बघायला मिळत आहे.

बुधवारी लोकसभा निकालावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी एएआयएडीएमकेला लक्ष्य केल्यानंतर या शाब्दिक युद्धाची सुरुवात झाली. या निकालावर बोलताना अन्नामलाई यांनी एएआयएडीएमकेला डिवचण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडू भाजपाने यंदा लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक प्रदर्शन केलं असून १२ जागांवर एएआयएडीएमकेला नमवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?

भाजपाच्या या टीकेला एएआयएडीएमकेचे नेते तथा मंत्री आर बी उदयकुमार यांनीही प्रत्युत्तर दिलं. अन्नामलाई यांनी बोलण्यावर ताबा ठेवला असता, तर निकाल यापेक्षा चांगला लागला असता. तामिळनाडूमध्ये दोन्ही पक्षाला जो पराभवाचा सामना करावा लागला, त्याला केवळ अन्नामलाई जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. तसेच अन्नामलाई यांनी बोलण्यावर ताबा ठेवला असता तर मोदी सरकारला बहुमतापासून दूर राहाव लागलं नसतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

पुढे बोलताना त्यांनी एएआयएडीएमके आणि भाजपा यांच्यातील युती संपुष्टात येण्यालाही अन्नामलाई जबाबदार असल्याचाही आरोप केला. जर आज तामिळनाडूमध्ये एएआयएडीएमके आणि भाजपा यांची युती असती, तर निश्चित आम्हाला चांगले यश मिळाले असते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही, याला जबाबदार केवळ अन्नामलाई आहेत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा – नरेंद्र मोदींचं वक्तव्य “एनडीए इतकं यश कुणालाच मिळालेलं नाही, सरकार चालवण्यासाठी बहुमत हवं, पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बी उदयकुमार यांच्या व्यतिरिक्त कोईंमबतूरमधील एएआयएडीएमकेचे नेते एसपी वेलूमनी यांनीही यावरून भाजपावर हल्लाबोल केला. जर तामिळानाडूमध्ये एएआयएडीएमके आणि भाजपा यांची युती असती, तर आम्हाला ३० ते ३५ जागांवर विजय मिळाला असता. मात्र, दुर्दैवाने तसे होऊ शकले नाही. याला जबाबदार केवळ अन्नामलाई आहेत. पूर्वी एएआयएडीएमके आणि भाजपा यांच्यातील युती मजबूत होती. मात्र, जेव्हापासून अन्नामलाई भाजपाचे अध्यक्ष झाले, तेव्हापासून दोन्ही पक्षातील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली, अशी टीका त्यांनी दिली.