डॉ. महेंद्र रेड्डी या सर्जनने त्याच्या डॉक्टर पत्नीला संपवल्याची घटना मागील महिन्यात समोर आली होती. डॉक्टर महेंद्रला पोलिसांनी सहा महिन्यांनी अटक केली होती. त्याने पत्नीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव रचला होता. प्रत्यक्षात डॉक्टर महेंद्रने त्याची पत्नी कृतिकाला भुल देण्याच्या औषधाचा ओव्हरडोस देऊन मारलं होतं. बंगळुरुतल्या या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावरही झाली होती. आता या डॉक्टरने एका महिलेशी लग्न करण्यासाठी पत्नीला ठार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महेंद्र रेड्डी आणि कृतिका रेड्डी हे दोघंही डॉक्टर. बंगळुरुतल्या मुन्नेकोलाला भागात हे दाम्पत्य राहात होतं. २१ एप्रिल २०२५ ला डॉ. कृतिका अचानक आजारी झाल्या. डॉ. महेंद्र रेड्डी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. रुग्णालयात पोहचण्याआधीच कृतिका यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मराठाहल्ली पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. ज्या ठिकाणी गुन्हा घडल्या त्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला असता त्यांना कॅन्युलाचा सेट, इंजेक्शन ट्युब आणि इतर मेडिकल उपकरणं मिळाली. हे सगळं साहित्य फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आलं. डॉ. कृतिका यांचा व्हिसेराही फॉरेन्सिक लॅबकडे आधीच पाठवण्यात आला होता. व्हिसेरा रिपोर्टवरुन हे स्पष्ट झालं की त्यांच्या शरीरात प्रोपोफोल नावाचं एक औषध गेलं होतं. हे औषध भूल देण्यासाठी वापरलं जातं, हे औषध उपचार म्हणून दिलं जात नाही. हा अहवाल आल्यानंतर कृतिका यांच्या वडिलांनी १३ ऑक्टोबरला त्यांचे जावई डॉ. महेंद्र रेड्डी यांच्या विरोधात हत्येचा आरोप करत गुन्हा दाखल केला. ज्यानंतर डॉक्टर महेंद्रला मागील महिन्यात अटक करण्यात आली. आता या प्रकरणी पोलिसांनी नवी माहिती दिली आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. महेंद्र रेड्डीने पत्नीच्या हत्येची कबुली देणारा मेसेज त्याच्या एका महिला डॉक्टरला ‘फोन पे’ वर पाठवला होता. तुझ्यासाठी मी माझ्या डॉ. पत्नीला ठार केलं असा तो मेसेज होता. या महिलेने डॉक्टर रेड्डीला इतर सर्व प्लॅटफॉर्मवरुन ब्लॉक केलं होतं असंही पोलिसांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. ज्या महिलेला डॉक्टरने मेसेज पाठवला तिचं लग्न आधीच झालेलं आहे. मात्र पत्नीच्या हत्येनंतर चार महिन्यांनी डॉ. महेंद्रने या महिलेला संपर्क केला. तिला लग्नासाठी मागणी घातली. मात्र तिचं लग्न झालं होतं. त्यामुळे तिने या डॉक्टरला ब्लॉक केलं. महेंद्र रेड्डीने पत्नीच्या हत्येनंतर सहा महिलांना संपर्क केला होता. त्यातल्या एका महिलेला त्याने मी तुझ्यासाठी बायकोला ठार केलं असा मेसेज केला होता. जो पोलिसांना मिळाला आहे त्यामुळे बंगळुरुतल्या या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलीस उपायुक्त के. परशुराम यांनीही फोन पे वरचा हा मेसेज आम्हाला मिळाला आहे असं सांगितलं.
