भावनिक गोष्टींचा आधार घेवून फसवणुकीचे जाळे विणले की माणूस सावध राहतोच असे नाही… कोलकात्यात घडलेली ही घटना याचंच ताजं उदाहरण आहे. एका व्यावसायिकाने अनोळखी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दयाळूपणाची किंमत त्याला तब्बल सहा लाखांच्या सोन्याने चुकवावी लागली.
कोलकात्याच्या ईएम बायपासवरील एका बार-कम-रेस्टॉरंटमध्ये ओळख झालेल्या महिलेने एका व्यावसायिकाचे तब्बल ६ लाख रुपयांचे सोने लुटण्याची घटना आता उघडकीस आली आहे. लुटलेल्या बाबींमध्ये दोन अंगठ्या आणि एक चेन याचा समावेश आहे. ९ जुलै रोजी, ५४ वर्षीय व्यावसायिक त्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तिथे दोन महिलांनी त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यापैकी एका महिलेने त्याच्याशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाईल नंबर घेतला. दोन दिवसांनी तिने पुन्हा व्यावसायिकाशी संपर्क साधला आणि वैयक्तिक अडचणी सांगत त्याला भेटण्यास सांगितले.
व्यावसायिकाने सुरुवातीला नकार दिला, पण शेवटी तो तयार झाला आणि त्याने मित्राच्या सॉल्ट लेक येथील घरी तिची भेट घेतली. तिथे तिने आई-वडिलांच्या उपचारांसाठी पैशांची मदत मागितली. पण जेव्हा व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तिने त्याच्याकडून सुमारे १०० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या तात्पुरत्या स्वरूपात मागून घेतल्या. दोन दिवसांत परत देण्याचे आश्वासन तिने दिले. मात्र त्यानंतर ती महिला नाहीशी झाली.
व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. “आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले