सामूहिक बलात्कार झालेल्या एका मुलीने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नात तिचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना येथे घडली, कोलकाता पोलिसांनी आपल्याला मुलीच्या मृतदेहासह राज्य सोडून बिहारमध्ये परत जाण्यास सांगितले आहे असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. मुलीचे वडील टॅक्सीचालक असून त्यांनी सांगितले, की पोलिसांनी काल रात्री आपल्याला मुलीचा मृतदेह घेऊन बिहारमध्ये परत जाण्याची धमकी दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी व काही स्थानिक लोकांनी आपल्याला राज्यातून बाहेर न गेल्यास टॅक्सी चालवू देणार नाही अशी धमकी दिली आहे, असेही ते म्हणाले.
सोळा वर्षांच्या या मुलीने सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर घरीच जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता नंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर डावे पक्ष व कोलकाता पोलिस यांच्यात मुलीच्या अंत्यसंस्काराच्या मुद्दय़ावरून जुंपली. डाव्या पक्षांनी राज्यपाल एम.के.नारायणन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. मुलीचे वडील सिटू संघटनेशी संबंधित असून त्यांनी सांगितले, की आमचे कुटुंबीय व कामगार संघटनेने मुलीचा मृतदेह पीस हेवन शवागारात ठेवण्याचा निर्णय घेतला व नंतर शोक मेळावे घेण्यात आले.
पोलिसांनी मात्र मुलीचा मृतदेह वडिलांना न विचारता जबरदस्तीने अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला, असा आरोप सिटूने केला आहे. पोलिसांनी या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर निमतला घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला पण मृत्यूचा दाखला वडिलांकडे असल्याने त्यांना अंत्यसंस्कार करता आले नाहीत. ही बातमी पसरताच माकपच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीकडे धाव घेऊन निदर्शने केली, असे माकपचे राज्य सदस्य सचिव राबीन देव यांनी सांगितले. शोक मेळावा घेण्यास पोलिसांनी नकार दिला, असेही ते म्हणाले. सह पोलिस आयुक्त राजीव मिश्रा यांनी सर्व आरोप फेटाळले असून जे काही करण्यात आले ते बिधानगर पोलिसांशी सल्लामसलतीनेच केले, असा दावा करताना मृतदेह सक्तीने ताब्यात घेतला नाही असे सांगितले. बिधानगर पोलिस उपायुक्त अर्णब घोष यांनी सांगितले, की ही घटना कोलकाता पोलिसांच्या हद्दीत घडलेली आहे, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. मुलीचा मृतदेह आता तिच्या कुटुंबीयांच्या व सिटूच्या ताब्यात असून त्यांनी शोक मेळावा घेण्याचे ठरवले आहे. डावे पक्ष सरकारविरोधात खोटा प्रचार करीत आहेत असा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे. आर.जी.के कार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाने उपचारात हलगर्जीपणा केला, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.