वृत्तसंस्था, कोलकाता
येथील ‘इस्कॉन’च्या रथयात्रेमध्ये वापरण्यात येणाऱ्या महाकाय रथासाठी यंदा चक्क सुखोई या रशियानिर्मित लढाऊ विमानाचे टायर वापरले जाणार आहेत. कंपनीकडून चार टायर कोलकात्याला आणले गेले असून सध्या ते रथाला बसविण्याचे काम सुरू आहे.

कोलकाता येथील ‘इस्कॉन’च्या जगन्नाथ रथयात्रेला ४७ वर्षांची परंपरा आहे. आतापर्यंत रथाला बोईंगचे टायर वापरले जात होते. मात्र आता हे टायर जुने झाल्यामुळे कडक झाले आहेत. २० वर्षांपासून टायर बदलण्याबाबत विचार सुरू होता. मात्र गतवर्षी एक टायर खराब झाल्यामुळे यात्रेमध्ये काही काळ खोडा पडल्यामुळे यंदा ‘इस्कॉन’ने हे टायर बदलण्याचा निर्णय घेतला. बराच शोध घेतल्यानंतर सुखोईचे टायर या रथाला व्यवस्थित बसतील, असे लक्षात आल्यानंतर संस्थेने रशियास्थित टायर निर्मात्यांकडे विचारणा केली. त्यानुसार कंपनीने चार टायर धाडून दिले असून आता ते रथावर बसविले जात आहेत. यंदा २७ जून ते ५ जुलै या काळात ही रथयात्रा होणार आहे. ओडिशातील पुरी येथे जगन्नाथाची मुख्य यात्रा निघते. मात्र देशभरातील अनेक मंदिरांमध्येही अशाच यात्रांचे आयोजन दरवर्षी केले जाते. कोलकाता येथील ‘इस्कॉन’ मंदिरातर्फे १९७२ सालापासून यात्रा काढली जाते.

कंपनीचे अधिकारी बुचकळ्यात

●‘इस्कॉन’ने कंपनीकडे टायरच्या किमतीबाबत विचारणा केल्यानंतर अधिकारी बुचकळ्यात पडले. लढाऊ विमानाचे टायर कशासाठी वापरले जाणार आहेत, याबाबत अधिकाऱ्यांना शंका होती. अखेर ‘इस्कॉन’ने रथ आणि रथयात्रेबाबत संपूर्ण माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●कंपनीचे काही अधिकारी स्वत: कोलकात्याला येऊन पाहणी करून गेले आणि त्यानंतर रथासाठी टायर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कोलकाता ‘इस्कॉन’चे प्रवक्ता राधारमण दास यांनी दिली.