भारतात कोलकाता हे सर्वात प्रदूषित महानगर असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. उष्ण कटीबंधीय आठ आशियाई देशात ज्या महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली त्यात कोलकाता शहरात ती सर्वाधिक होती असे निष्पन्न झाले आहे. लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलीपीन्स, इंडोनेशिया, मलेशिया, भारत व जपान या आठ देशात कार्बनी प्रदूषकांची पातळी (पर्सिस्टन्ट ऑरगॅनिक पोल्युटन्टस) मोजण्यात आली. या अभ्यासानुसार भारतात पॉलिसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स ही कार्बनी कर्करोगकारक द्रव्ये इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहेत, असे मरिन पोल्युशन बुलेटिन या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधात म्हटले आहे. ज्या महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी या आठ देशांमध्ये सर्वाधिक आहे त्यात कोलकाता सर्वात जास्त प्रदूषित आहे. टोकियो कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भारतीय वैज्ञानिक डॉ. महुआ साहा यांनी हे संशोधन केले आहे. भारताच्या शहरी भागात पॉलिसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचे प्रमाण सरासरी ग्रॅममागे ११३० नॅनोग्रॅम आहे; ते मलेशियात सर्वात कमी म्हणजे ग्रॅममागे २०६ नॅनोग्रॅम आहे. इतर आशियाई देशांपेक्षा भारतात प्रदूषणाची पातळी जास्त आहे, ही धोकादायक बाब असल्याचे महुआ शहा यांनी म्हटले आहे.पॉलिसायक्लिक अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचे (पीएएच) विघटन होत नाही किंबहुना त्यास विरोध होतो. तसेच या रसायनांचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ह्रदयरोग, कर्करोग, श्वासाचे रोग, लठ्ठपणा, मधुमेह हे रोग होतात असे त्यांनी सांगितले. आठ देशात १७४ ठिकाणाचे नमुने घेऊन नऊ वर्षे हे संशोधन करण्यात आले आहे. पीएएच हे रासायनिक पदार्थ जलरोधक गुणधर्मामुळे पाण्यात विरघळत नाहीत. ते घनपदार्थात शोषले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata most polluted city in india
First published on: 01-11-2014 at 01:50 IST