Kolkata Rape Case News : पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील एका न्यायालयाने बलात्काराच्या आरोपीला निर्दोष मुक्त केलं आहे. कारण तक्रारदार महिलेने दावा केला आहे की तिने ‘गैरसमजातून’ तक्रार दाखल केली होती. आरोपीने सदर प्रकरणात ५१ दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर त्याची सुटका झाली आहे. २४ नोव्हेंबर २०२० रोजी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याला जामीन मिळाला. तत्पूर्वी ५१ दिवस तो तुरुंगात होता.

महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की २०१७ पासून तिचे या इसमाबरोबर प्रेमसंबंध होते. या काळात या इसमाने तिला लग्नाचं अमिष दाखवून तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि तिथून पळून गेला. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सदर इसमाला अटक केली. १४ जानेवारी २०२१ रोजी त्याला न्यायालयाने जामीन दिला. तत्पूर्वी ५१ दिवस तो तुरुंगात होता.

महिलेने न्यायालयाला काय सांगितलं?

दरम्यान, आता या महिलेने न्यायालयाला सांगितलं की तिने चुकून या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. ती म्हणाले, “पोलिसांत दिलेली तक्रार मी नव्हे तर माझ्या मित्राने लिहिली होती. तक्रार अर्जात काय लिहिलंय हे वाचण्याऐवजी मी थेट त्यावर स्वाक्षरी केली होती.”

नेमकी घटना काय?

महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की “या व्यक्तीने लग्नाचं वचन देऊन मला सॉल्ट लेक येथील एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाबद्दल विचारल्यानंतर त्याने नकार दिला आणि तिथून पळून गेला. तो काही दिवसांनी कोलकात्यामधून फरार झाला.” सदर व्यक्ती फरार झाल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर तो ५१ दिवस तुरुंगात होता. न्ययालयाने १४ जानेवारी २०२१ रोजी त्याचा जामीन मंजूर केला. तेव्हापासून हा इसम जामीनावर बाहेर आहे. मात्र, आता तक्रारदार महिलेने तक्रार मागे घेतली आहे.