कुडनकुलम अणुभट्टी प्रकल्पाबाबत रशियाशी लवकरच करार

अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत व रशिया यांच्यात कुडनकुलम या अणुभट्टीच्या पाचव्या व सहाव्या टप्प्याबाबत करार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा बुधवारपासून सुरू होत असून त्यात हा करार अंतिम टप्प्यात पोहोचेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सूत्रांनी सांगितले की, विविध राज्यांकडे असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांचा वापर पुरेशा प्रमाणात करून घेतला जाणार आहे कारण भारताची विजेची गरज भागत आहे. मोदी यांचा रशिया दौरा २३ ते २४ डिसेंबर दरम्यान होत असून त्यांची शिखर बैठक रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर मॉस्कोत होणार आहे.

पंतप्रधानांच्या भेटीआधी रशियाच्या रोसॅटम या अणुऊर्जा संस्थेचे उपकार्यकारी अधिकारी निकोलाय स्पॅस्की यांनी ७ आणि ८ डिसेंबरला भारतात भेट देऊन भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखर बसू यांच्याशी चर्चा केली. त्यात कुडनकुलम ५ आणि ६ या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. उभय देशात झालेल्या चर्चेत कुडनकुलम प्रकल्प १ आणि २, तसेच प्रकल्प ३ आणि ४ यांचा प्रारंभ यावरही चर्चा करण्यात आली. याशिवाय पुढील प्रकल्पांवर सहकार्याचे सूतोवाचही झाले. नवीन कराराचा तपशील अजून ठरवला जात आहे.

जैतापूर प्रकल्पाला वेग देणार

प्रकल्प ५ आणि  ६ मध्ये व्हीव्हीइआर तंत्रज्ञान वापरले जात असून ते १ ते ४ या प्रकल्पांमध्येही वापरले असले तरी आता या तंत्रज्ञानाची किंमत वाढली आहे. भारत सहा अणुभट्टय़ा सुरू करीत असून त्यात जैतापूर (इपीआर १००० च्या ६)ही अणुभट्टी महाराष्ट्रात फ्रेंच तंत्रज्ञानाने उभारली जाईल, आंध्र प्रदेशात कोवादा येथे (१००० मेगावॉटच्या  ६) व गुजरातमध्ये मिठी विरधी येथे (१००० मेगावॉटच्या ६) यांचा समावेश आहे.