पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठीची मागणी भारताकडून करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान मागणी मान्य करत भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटीची परवानगी दिली होती. गुरुवारी झालेल्या भेटीनंतर पाकिस्ताननं तिसऱ्यांदा भेटीसाठी परवानगी दिली आहे.

इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयातील दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी गुरूवारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. भारतानं केलेल्या मागणीनंतर पाकिस्ताननं भेटीची परवानगी दिली होती. मात्र, पाकिस्ताननं कुलभूषण जाधव आणि भारतीय राजनैतिक अधिकारी यांच्या भेटीची व्यवस्था ठरल्याप्रमाणे केली नव्हती. यामुळे या भेटीत मुक्त संवाद साधता आला नाही, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

राजनैतिक अधिकारी व कुलभूषण जाधव यांच्यात कुठल्याही अडथळ्यांशिवाय व विनाअट चर्चा व्हावी अशी विनंती भारताकडून सातत्यानं केली जात आहे. त्यानंतर पाकिस्ताननं तिसऱ्यांदा कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी दिली असून, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी यांची माहिती दिली. भेटीवेळी सुरक्षा कर्मचारी न ठेवण्याची भारताची मागणी असून, त्यासंदर्भात तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत, असं कुरेशी यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “आपल्या दुर्दैवी शेजाऱ्यांप्रमाणे…”, करोनाची स्थिती सांगताना इम्रान खान यांनी साधला भारतावर निशाणा

जाधव यांना ‘हेरगिरी व दहशतवादाच्या’ आरोपांखाली पाकिस्तानातील एका लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर काही आठवडय़ांनी, या शिक्षेला आव्हान देण्यासाठी आणि जाधव यांना राजनैतिक संपर्क नाकारण्याच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तानने या शिक्षेचा ‘परिणामकारक फेरविचार’ करावा आणि त्यांच्याशी संपर्क करण्याची भारताला परवानगी द्यावी, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्या वर्षी जुलैत दिला होता.