भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव  यांना आता नव्या संकटाला सामोरे जावे लागते आहे. कुलभूषण जाधव यांच्या विरोधात आता दहशतवाद पसरवल्याचे आणि तोडफोड केल्याचे आरोप केले आहेत. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. भारतीय गुप्तचर संघटना रॉ साठी कुलभूषण जाधव कार्यरत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तसेच हेरगिरी करत असल्याचाही आरोप पाकिस्तानने केला आहे. तसेच एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याविरोधात कट रचत कुलभूषण जाधव यांच्यावर दहशतवाद पसरवल्याचे आणि तोडफोड केल्याचे आरोप केले आहेत. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राने या संदर्भातले वृत्त दिले आहे. जाधव यांच्याविरोधात दहशतवादाचे आणि तोडफोडीचे आरोप ठेवण्यात आल्याचे पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. कुलभूषण जाधव यांच्याविरोधात अनेक प्रकरणे आहेत. जाधव यांनी तोडफोड केल्याचे आणि दहशतवाद पसरवल्याचे खटले बाकी आहेत असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

तोडफोड आणि दहशतवाद प्रकरणी लवकरच कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात भारताच्या १३ अधिकाऱ्यांकडे पाकिस्तानने भेटीची वेळ मागितली होती. मात्र भारताने काहीही सहकार्य केले नाही असाही दावा डॉन या वृत्तपत्राच्या बातमीत करण्यात आला आहे. कुलभूषण जाधव हे नेमके कोणाच्या इशाऱ्यांवर काम करत होते याची माहिती आम्हाला मिळवायची आहे. कुलभूषण जाधव यांनी मुबारक हुसैन पटेल या नावाने पासपोर्ट का तयार केला होता? मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर भागात त्यांची काय मालमत्ता आहे याचीही माहिती हवी असल्याचे पाकने म्हटले आहे.

डिसेंबर महिन्यात कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई या दोघी त्यांना भेटण्यासाठी इस्लामाबादमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी या दोघींनाही पाकिस्तानने हीन वागणूक दिली होती. तसेच कुलभूषण जाधव हा भारतीय दहशतवादाचा चेहेरा असल्याचीही टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तानवर चांगलीच टीका झाली. आता कुलभूषण जाधव यांच्या विरोधात दहशतवाद पसरवल्याचे आणि तोडफोड केल्याचे आरोप पाकने केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kulbhushan jadhav now undergoing trial on terrorism and sabotage charges report
First published on: 06-02-2018 at 17:26 IST