देशभरात आपल्या विकासकामांचा व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा ढोल वाजवणाऱ्या भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. इतर राजकीय पक्षांप्रमाणेच भाजपही सत्तेत आल्यानंतर जनतेला दिलेली आश्वासने पाळत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. कलम ३७० असो किंवा प्रत्येक कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून देण्यासारखी आश्वासने, यातील एकही शब्द पक्षाने पूर्ण केला नसून पुढील वेळी आपण पक्षाकडे उमेदवारीही मागणार नसल्याचे खासदार राजकुमार सैनी यांनी म्हटले आहे. कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटवर ते संसदेत पोहोचले आहेत. धर्मशाला येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. सैनी यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील खासदारांमध्ये असलेली अस्वस्थता दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
मी आता पुन्हा एकदा भाजप किंवा इतर राजकीय पक्षाकडे उमेदवाीर मागण्यास जाणार नाही. असंघटीत व मागास लोकांना न्याय मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले. २६ नोव्हेंबर रोजी जिंद येथे लोकतंत्र सुरक्षा मंचच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून जनतेला विचारून राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण ठरतील असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
मला मुख्यमंत्री बनायचं नाही की इतर कोणते पद मिळवायचं नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी स्थानिक नेते दिनेश सैनी, सूर्यप्रकाश आर्य, राजेंद्र सैनी, सुरेश किनाना, नगरसेवक नरेश सैनी, जिल्हा परिषद सदस्य विनोद सैनी उपस्थित होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या १०० दिवसांत सरकारने कोणकोणती कामे केली, याबाबतचा अहवाल योगी यांनी सादर केला. आतापर्यंतची सरकारची कामगिरी समाधानकारक आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकार दरवर्षी २४ जानेवारीला उत्तर प्रदेश दिवस म्हणून साजरा करणार आहे, अशी घोषणा योगींनी केली. जातीयवाद, घराणेशाहीमुळे गेल्या १४ ते १५ वर्षांत उत्तर प्रदेश विकासाच्या बाबतीत मागे पडला होता. पण भाजप सरकार समाजातील सर्व वर्गांचा विकास करण्यासाठी काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील महिला आता स्वतःला सुरक्षित समजू लागल्या आहेत, असंही ते म्हणाले.