नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र राज्य सरकारची अनास्था आणि मंत्र्यांच्या मानापमानामुळे सुरू होऊ शकलेले नाही. दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात अतिशय गाजावाजा करून या केंद्रासाठी दहा कोटींचा निधी जाहीर करण्यात आला. मात्र, पाच महिन्यांनंतरही तो ‘जेएनयू’कडे पोहोचला नसल्याने विद्यापीठ प्रशासनानेही या केंद्राकडे पाठ फिरवल्याचे समजते.
‘जेएनयू’मध्ये मराठी भाषा, साहित्याच्या अभ्यास आणि संशोधनासाठी स्वतंत्र विभाग असावा, या कल्पनेतून २००८साली मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गेल्या १७ वर्षांपासून त्याबाबतीत काहीही घडले नव्हते. या वर्षी फेब्रुवारीत दिल्लीमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या तिघांनीही ‘जेएनयू’च्या कुलगुरू शांतिश्री धूलिपुड़ी पंडित यांच्याशी दोन अध्यासन केंद्रे सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यास केंद्र तसेच, कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र या दोन्हींचा समावेश होता. या दोन्ही केंद्रांना दहा कोटींचा निधी दिला जाईल आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरवदिनी ती सुरू करण्यात येतील, अशी घोषणा सामंत यांनी केली होती. परंतु, कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनासाठी सरकारने पाच महिन्यांत एक पैसाही दिलेला नाही.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यास केंद्रासाठी १० कोटी मंजूर झाले असून चालू शैक्षणिक वर्षात या केंद्राने संशोधनांवर लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रात २२ व २३ मार्च २०२५ रोजी पहिले राष्ट्रीय चर्चासत्रही आयोजित केले होते, अशी माहिती ‘जेएनयू’च्या प्रशासनाने दिली.
मानापमानातून उद्घाटन लांबणीवर?
‘जेएनयू’तील या दोन्ही केंद्रांच्या उद्घाटनाच्या २७ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर मंत्र्यांच्या मानापमान नाट्यामुळे पाणी फेरले गेल्याचे कळते. या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार होते. ‘जेएनयू’ने या उद्घाटनासाठी निमंत्रणपत्रिकांचे वाटप केले होते. पण, उद्घाटनासाठी ‘जेएनयू’ने अधिकृत विनंती न केल्याचे कारण देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समारंभाला उपस्थित राहण्यास नकार दिला होता, असा दावा मंत्रालयातील सूत्रांनी केला. या निमंत्रणपत्रिकेमध्ये मराठी भाषामंत्री उदय सामंत तसेच, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या नावांचा समावेश नसल्याने हे मंत्रीदेखील नाराज झाले होते, असे कळते. शिवाय, ही केंद्रे सुरू करण्यामध्ये एकनाथ शिंदे गटाने पुढाकार घेतल्याने भाजप व संघाशी निगडित काही मंडळींचाही या उद्घाटनाला विरोध होता, असा दावा सूत्रांनी केला. ‘जेएनयू’ प्रशासनाने मात्र, हा समारंभ प्रशासकीय कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आला, असे स्पष्टीकरण ‘लोकसत्ता’ला दिले. दोन्ही केंद्रांच्या उद्घाटनाबाबत महाराष्ट्र सरकारकडून ‘जेएनयू’ला अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आल्याचा दावा ‘जेएनयू’च्या प्रशासनाने केला. असे असले तरी, आता हे उद्घाटन नेमके कधी होणार याबाबत ‘जेएनयू’ प्रशासनाने मौन बाळगले आहे.
●राज्य सरकारने २००८मध्ये मराठी भाषा अध्यासनासाठी जेएनयूला दीड कोटीचा निधी पुरवला होता. मात्र, हा निधी पुरेसा नसल्याने ‘जेएनयू’ने मराठी भाषेसाठी ‘कुसुमाग्रज विशेष केंद्र’ स्थापन करण्याचा नवा प्रस्ताव सादर केला होता.
●मात्र, या केंद्रासाठी दहा कोटी देण्यापूर्वी २००८मध्ये दिलेल्या दीड कोटीच्या निधीची सद्या:स्थिती काय, अशी विचारणा राज्याच्या अर्थ विभागाने जेएनयूकडे केली आहे.
●याबाबत ‘जेएनयू’कडून राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. हा मुद्दादेखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यातील मोठी अडचण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.