सौदी अरेबियात महिलांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर प्रथमच नगर परिषदांच्या निवडणुका होत असून आज मतदान झाले. सौदी अरेबियासारख्या कर्मठ देशात प्रथमच महिलांना मतदानाचा व निवडणुकीस उभे राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे असले तरी तेथे अजूनही महिला व पुरूष यांच्यात भेदभाव आहे यात शंका नाही.

सौदी अरेबियात राजेशाही असून तेथे महिलांना गाडी चालवण्यावर बंदी आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांना डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घ्यावा लागतो. सौदी अरेबिया हा केवळ पुरुषांना मतदानाचा अधिकार असलेला शेवटचा देश होता. आताच्या निवडणुकीत ९०० महिला व ६ हजार पुरूष रिंगणात असून मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांना बरीच वाट पाहावी लागली. मतदानाचा व निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार दिला असला तरी महिला उमेदवार पुरूष मतदारांना भेटू शकत नाहीत अशी आजही स्थिती आहे व त्यासाठी त्यांना पुरुषांची मदत घ्यावी लागते. महिला व पुरुषांची मतदान केंद्रेही वेगळी ठेवली होती. महिला मतदारांची अधिकृत संख्या १० टक्के असून त्यामुळे त्यांना जिंकणे अवघड आहे. अमल बद्रेलदिन अल सवारी यांनी सांगितले की, खरे सांगायचे तर निवडणूकजिंकण्यासाठी मी लढत नाही. निवडणूक लढवायला मिळाली ही मोठी लढाई होती. सौदी अरेबियात २८४ जागांपैकी एक तृतीयांश जागांवर स्थानिक प्रशासन मंत्रालय नियुक्त्या करते त्यात महिलांना स्थान मिळण्याची आशा आहे. अलझाजी अल होसेनी या महिलेने तिचा प्रचार १२ दिवस इंटरनेटवरून केला त्यात जाहीरनामाही मांडला त्यामुळे पुरूष व स्त्रिया ते पाहू शकत होते. तीन महिलांना काही कारणास्तव निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आले होते.

मध्यपूर्वेतील कर्मठतेचे प्रतीक म्हणून सौदी अरेबियाकडे पाहिलं जातं. पण, शनिवारचा दिवस या देशातील स्त्रियांसाठी कर्मठतेचे दरवाजे किलकिले करून गेला. रियाध शहराच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदार आणि उमेदवार म्हणून अधिकार मिळाला.