आसामध्ये ‘लेडी सिंघम’ अशी ख्याती असणाऱ्या एका महिला उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची कार एका कंटेनरला धडकली. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. जुनमोनी राभा असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत होत्या. अपघाताच्या वेळी कारमध्ये त्या एकट्याच होत्या. शिवाय त्यांनी आपला पोलीस गणवेशही परिधान केला नव्हता.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात नागाव जिल्ह्याच्या जाखलाबंधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडला. मृत महिला पोलीस अधिकारी जुनमोनी राभा या ‘लेडी सिंघम’ किंवा ‘दबंग कॉप’ या नावानं ओळखल्या जायच्या. जेव्हा अपघात घडला तेव्हा त्यांच्याबरोबर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, शिवाय त्यांनी पोलिसांचा गणवेशही परिधान केला नव्हता. त्या एकट्याच कारने अप्पर आसामच्या दिशेनं जात होत्या.

“पहाटे अडीचच्या सुमारास सूचना मिळाल्यानंतर, पोलिसांच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जुनमोनी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखलं केलं. पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं,” अशी माहिती जाखलाबंधा पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन कलिता यांनी दिली.

मृत जुनमोनी राभा या मोरीकोलॉन्ग पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होत्या. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना ओळखलं जात होतं. शिवाय एका आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोप झाल्यानंतरही त्या चर्चेत आल्या होत्या. अलीकडेच त्यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली होती.

होणाऱ्या नवऱ्यालाही केलं होतं अटक

गेल्या वर्षी जुनमोनी यांनी एका फसणुकीच्या प्रकरणात आपल्या होणाऱ्या नवऱ्याला अटक केली होती. यानंतर त्यांनाही त्याच प्रकरणात अटक झाली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करत त्यांना सेवेतून निलंबित केलं होतं. मात्र, काही दिवसानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आणि त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्या होत्या.

या अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी कंटेनर ट्रक ताब्यात घेतला आहे. या ट्रकवर उत्तर प्रदेशचा नोंदणी क्रमांक आहे. तसेच जुनमोनी या सिव्हील कपडे परिधान करून आणि कोणत्याही सुरक्षेशिवाय आपल्या खासगी कारने अप्पर आसामच्या दिशेने का जात होत्या? हे अद्याप पोलिसांना समजलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, जुनमोनी राभा यांच्या आई सुमित्रा राभा यांनी अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. जुनमोनी राभा यांचा कोणत्यातरी अज्ञात टोळीने पूर्वनियोजित पद्धतीने खून केला आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी सखोल चौकशी करावी. तसेच अपघातात दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी, सुमित्रा राभा यांनी केली.