राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याबाहेर एकमेव खासदार आहेत. लक्षद्विप लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. त्यांना खून करण्याच्या प्रयत्नासाठी लक्षद्वीपमधील कवरत्ती जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००९ च्या प्रकरणात खासदार फैजल यांच्यासह तीन जणांना ही शिक्षा सुनावली आहे. तसेच चारही आरोपींना कोर्टाने एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मोहम्मद फैजल हे शरद पवार यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. लोकसभेत त्यांनी लक्षद्विपच्या प्रश्नांवर अनेकदा आग्रही भूमिका मांडली आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रकरण

या प्रकरणातील वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, खासदार मोहम्मद फैजल आणि इतर तीन आरोपींनी माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालेह यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राजकीय विषयांवरुन हा हल्ला घडला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या सालेह यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले की, ते वरच्या कोर्टात या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात अपील करणार आहेत. जर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला तर त्यांना आपली खासदारकी गमवावी लागू शकते. माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी फैजल यांनी केला.