पीटीआय, इटानगर
अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन होऊन राष्ट्रीय महामार्ग-३१३ चा हुनली आणि एनेनी दरम्यानचा एक भाग कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

भूस्खलनानंतर दिबांग व्हॅलीचा संपर्क जिल्हा मुख्य भागापासून तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यासाठी कामगार आणि पुरेशी मशीन तैनात केली आहेत. भारत-चीन सीमेपासून सुमारे ८३ किमी अंतरावर असलेल्या लोअर दिबांग खोऱ्यातील रोइंग ते अनिनीला जोडणारा मुख्य राष्ट्रीय महामार्ग खराब झाला आहे.

हेही वाचा >>>‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया

अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी रात्री भूस्खलनामुळे दिबांग व्हॅली जिल्हा मुख्यालय – हुनली आणि एनेनी दरम्यानचा रस्ता खराब झाला आणि सीमावर्ती जिल्ह्याचा संपर्क मुख्य भूभागापासून तुटला आहे. वाहतूक पूर्ववत होण्यास काही दिवस लागतील. गुरुवारी सायंकाळपर्यंत लहान वाहने रस्त्यावरून जाऊ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ‘‘हा रस्ता दिबांग व्हॅलीला देशाच्या इतर भागाशी जोडत असल्याने लवकरात लवकर संपर्क पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोइंग-एनेनी महामार्ग ही दिबांग व्हॅली जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. चीनला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाच्या सुरक्षेसाठी हा रस्ता सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचा असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत लोकांनी सावधगिरी बाळगावी आणि प्रवास टाळावा, असा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे.