भारतासह जगातील १९० हून अधिक देश करोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रभावित आहेत. भारतात आज करोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ४० हजाराच्यावर आढळणारी रुग्णसंख्या आज (मंगळवार) ३० हजारांवर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३०,५४९ नवीन करोना रुग्ण आढळले. या दरम्यान ४२२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ४,२५,१९५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांमध्ये ३८,८८७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात ३,०८,९६,३५४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के आहे. गेल्या २४ तासांमध्ये, बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त होती. यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. सध्या देशात ४,०४,९५८ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.

राज्यात आज ८ हजार ४२९ जण करोनामुक्त

राज्य सरकारने एकीकडे राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली जाहीर केलेली असताना, दुसरीकडे राज्यातील करोनाच्य दैनंदिन आकडेवारीतही दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. राज्यात काल दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यासाठी हे काहीसे दिलासादायकच म्हणावे लागणार आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ८६९ नवीन करोनाबाधित आढळले तर, ८ हजार ४२९ रूग्ण करोनातून बरे झाले. याशिवाय, आज ९० रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली. राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,०३,३२५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.६५ टक्के एवढे झाले आहे. तर, आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,१५,०६३ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३३०३८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.