फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांचे मत

लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन यासारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना भारताला लक्ष्य करीत असून अशा संघटनांविरोधात निर्णायक कृती करावी, अशी आग्रही मागणी फ्रान्सने केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी भारताला सहकार्य करण्याचा निर्धारही फ्रान्सने व्यक्त केला आहे.

जैशचा म्होरक्या मसूद अझर याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवाद घोषित करण्याच्या मार्गात चीनने अडसर निर्माण केला आहे, मात्र चीनचा नामोल्लेख न करता फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-मार्क अयरॉल्ट यांनी म्हटले आहे की, दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा निर्धार प्रत्येक ठिकाणी सारखाच असला पाहिजे.

उरी येथील लष्कराच्या छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने गेल्या सप्टेंबर महिन्यात सीमेपलीकडे केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईबाबत अयरॉल्ट म्हणाले की, अशा प्रकारच्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक देशाला आहे.

अलीकडेच करण्यात आलेला उरी येथील हल्ल्यासह भारतात करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा फ्रान्स निषेध करीत आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध जी लढाई सुरू केली आहे त्याला फ्रान्सचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही या वेळी अयरॉल्ट म्हणाले. अयरॉल्ट भारत भेटीवर आले असून त्यांनी वृत्तसंस्थेशी बातचीत केली.

सर्व देशांनी त्यांच्या भूमीतील दहशतवाद अथवा त्यांच्या नियंत्रणाखालील प्रदेशातून होणाऱ्या दहशतवादाविरुद्ध लढले पाहिजे, असे मतही अयरॉल्ट यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता मात्र पाकिस्तानकडे स्पष्ट अंगुलीनिर्देश करून सांगितले. भारताला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी संघटनांविरुद्ध विशेषत: लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत राहून निर्णायक कारवाई करण्यात आली असल्याचे पाहण्याची आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून ते मुख्यत्वे व्हायब्रण्ट गुजरात परिषदेत सहभागी होणार आहेत. भारताने केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, दहशतवादाचे समर्थनच होऊ शकत नाही, प्रत्येक ठिकाणी दहशतवादाचा मुकाबला समान निर्धारानेच केला पाहिजे.

मसूद अझर याच्यावर र्निबध घालण्याच्या मार्गात चीनने अडसर निर्माण केला असल्याबद्दल अयरॉल्ट यांनी खंत व्यक्त केली. संयुक्त प्रयत्न करूनही त्या प्रयत्नांना यश मिळाले नाही, असे ते म्हणाले.