पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी रूग्णालये यांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत आजपासून संपुष्टात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे आज मध्यरात्रीपासून दैनंदिन व्यवहारात पाचशे आणि हजाराच्या नोटा केवळ कागदाचा तुकडा बनून राहणार आहेत. नागरिकांना आता केवळ बँकेच्या माध्यमातूनच पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र आणि राज्य सरकारने सरकारी विभागांमध्ये २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिली होती. तसेच चलन तुटवड्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी टोलबंदीचीही घोषणा केली होती. नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील टोलनाक्यांवर खूप मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे केंद्र सरकारने टोल माफ केला होता. टोलबंदीची ही मुदतदेखील आज मध्यरात्रीपासूनच संपुष्टात येत आहे. त्यामुळे गेले काही दिवस विनाटोल प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या वाहनधारकांना उद्यापासून टोल भरावा लागणार आहे. दरम्यान, नागरिकांना बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठीची मुदतही ३० डिसेंबरला संपत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, नोटाबंदीवर जनमत जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या अॅपवर आतापर्यंत पाच लाख लोकांनी मते व्यक्त केली असून ९३ टक्के जनतेने या निर्णयाचे समर्थन केल्याचा दावा सरकारने केला आहे. भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात लढाई आवश्यक असल्याचे मत ९९ टक्के लोकांनी नोंदवले आहे. ९० टक्के लोकांनी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ९२ टक्के लोकांनी भ्रष्टाचारविरोधात मोदी सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के लोकांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर ९२ टक्के लोकांच्या मते या निर्णयामुळे काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादावर लगाम लावण्यास मदत मिळेल असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last day of accepting old 500 and 1000 notes at public places
First published on: 24-11-2016 at 11:33 IST