Lawrence Bishnoi Gang : कॅनडा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. एनडीपी आणि कंझर्व्हेटिव्ह नेत्यांच्या मागणीनंतर कॅनडा सरकारने सोमवारी (२९ सप्टेंबर) लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीवर भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खंडणी, खून, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संबंधित गुन्हे दाखल आहेत.
कॅनडा सरकारमधील सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी ही घोषणा केली आहे. मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी एका निवेदनात म्हटलं की, “हिंसाचार आणि दहशतवादाच्या कृत्यांना कॅनडामध्ये कोणतंही स्थान नाही. विशेषत: विशिष्ट समुदायांना लक्ष्य करून भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या कृत्यांना स्थान नाही. त्यामुळे कॅनडा सरकारने बिश्नोई गँगला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केलं आहे”, असं मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
कॅनडा सरकारच्या या निर्णयामुळे कॅनेडियन अधिकाऱ्यांना कॅनडामधील बिश्नोई टोळीशी संबंधित कोणत्याही मालमत्ता, मग त्यामध्ये पैसे, वाहने आणि इतर मालमत्तांचा समावेश असलेल्या गोष्टी गोठवण्याची किंवा जप्त करण्याची परवानगी मिळते. हे कायद्याच्या अंमलबजावणीला विविध गुन्ह्यांसाठी विशेषतः दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा करण्याशी संबंधित गुन्ह्यांसाठी किंवा टोळी सदस्यांना अटक करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी अधिक अधिकार मिळतात.
दरम्यान, कॅनेडियन कायद्यानुसार एखाद्या घोषित दहशतवादी गटाला जाणूनबुजून मालमत्ता किंवा आर्थिक मदत प्रदान करणे किंवा त्या संबंधित मालमत्तेचा व्यवहार करणे हा गुन्हा मानला जातो. बिश्नोई गँग ही एक गुन्हेगारी संघटना असून ती भारताबाहेर कार्यरत असल्याचं बोललं जातं. बिश्नोई गँग खून, गोळीबार आणि जाळपोळ अशा गुन्ह्यासह खंडणी आणि धमकी देऊन दहशत निर्माण करते, असंही कॅनडा सरकारच्या निवेदनात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
लॉरेन्स बिष्णोई आहे तरी कोण?
लॉरेन्स बिष्णोईनं त्याचं शालेय शिक्षण अबोहारमधल्या एका नावाजलेल्या शाळेत पूर्ण केलं. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी तो चंदीगडला गेला. ११वी-१२वीमध्ये असताना त्याचा अॅथलेटिक्समध्ये रस वाढला. विशेषत: दीड हजार मीटर शर्यतीमध्ये. महाविद्यालयीन शिक्षणासाठी लॉरेन्स बिष्णोईनं विद्यापीठात प्रवेश घेतला आणि त्याचा गुन्हेगारीशी परिचय सुरू झाला.
महाविद्यालयाल लॉरेन्स बिष्णोई विद्यार्थी राजकारणात सक्रीय झाला. तेव्हाच तो काही छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगात देखील जाऊन आला होता. विद्यापीठात असताना २०११ ते २०१२ या काळात लॉरेन्स बिष्णोई तिथल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष देखील झाला. याच काळात त्याचा दुसरा एक साथीदार ब्रारशी त्याची ओळख झाली. लॉरेन्स बिष्णोईला राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ या पट्ट्यामध्ये चालणाऱ्या गुन्हेगारी विश्वावर राज्य करायचं होतं. खरंतर २००८मध्येच लॉरेन्स बिष्णोईनं विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत ब्रारचा विरोधी असलेल्या एका विद्यार्थ्यावर गोळी झाडली होती. तेव्हा तो दोन महिने तुरुंगातही राहिला होता.