नाटय़ आणि चित्रपट क्षेत्रावरही आपल्या लक्षणीय अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या, गेल्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचे गुरुवारी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आयुष्याचा तब्बल शतकभराहून अधिक दीर्घकाळ प्रवास करणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या १०२व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. गेले तीन दिवस त्या आजारीच असल्याची माहिती त्यांच्या कन्या किरण यांनी दिली.
संपूर्ण आयुष्य आपल्याच मर्जीनेच जगणाऱ्या जोहरा यांच्या निधनामुळे कला आणि संस्कृतीची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया इतिहासकार इरफान हबीब यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
एक नृत्यांगना म्हणून जोहरा सेहगल यांनी प्रख्यात नर्तक उदयशंकर यांच्यासमवेत आपली कारकीर्द १९३५ मध्ये सुरू केली. विविध नाटके, दूरचित्रवाणीवरील अनेक मालिकांसह त्यांनी बॉलीवूड व इंग्रजी चित्रपटांमध्येही चरित्र भूमिका केल्या होत्या. ‘ग्रॅण्ड ओल्ड लेडी’ या नावाने बॉलीवूडमध्ये परिचित असलेल्या जोहरा यांनी सन २००७ मध्ये शेवटची भूमिका रंगविली होती, संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटात. पद्मश्री पुरस्कार विजेत्या जोहरा यांना २०१० मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल से’, ‘चीनी कम’ आदी चित्रपटांतही जोहरा यांनी भूमिका केल्या होत्या. ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ या संस्थेच्या त्या सदस्या होत्या. या संस्थेच्या ‘धरती के लाल’ तसेच चेतन आनंद यांच्या ‘नीचा नगर’ या चित्रपटांमध्ये त्यांनी ४०च्या दशकात भूमिका केल्या.दरम्यान, माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, बिग बी अमिताभ बच्चन, निर्माता मधुर भांडारकर, दूरदर्शन निर्माते सिद्धार्थ बसू तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.