मुंबई : नृत्य, गायन, वादन, नाटय़, चित्रकला यांचा देखणा आविष्कार सोमवारी हरपला. आधुनिक कथ्थक नृत्याचे शिल्पकार म्हणून ओळखले गेलेले प्रसिद्ध कथ्थक सम्राट, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. लखनऊमधील दरबारी कथ्थक ते जगभरच्या नृत्यमहोत्सवातील नाविन्यपूर्ण कथ्थक नृत्याविष्काराचा चेहरामोहरा असलेले एकमेवाद्वितीय गुरूतुल्य व्यक्तिमत्व शांतवले.

 ‘महाराजजी’ याच नावाने परिचित असलेले पंडित बिरजू महाराज गेले काही दिवस मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त होते. सोमवारी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी नातवाबरोबर खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. वयाची ऐंशी पार केल्यानंतरही कथ्थक सादरीकरणातील त्यांची उर्जा, अदा ही भल्याभल्यांना थक्क करून टाकणारी होती. त्यांनी विकसित केलेली कथ्थक नृत्यशैली ही सर्व घराण्यांनी उचलून धरली. कथ्थक म्हणजे बिरजू महाराज हे अतूट समीकरण गेल्या काही दशकांतील पिढय़ांनी अनुभवले आहे.

पंडित बिरजू महाराज म्हणजेच ब्रिजमोहन मिश्रा  हे शास्त्रीय कथ्थक नृत्यातील अग्रणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका-िबदादिन घराण्याचे नर्तक. कथ्थक नृत्याचा वारसा हा त्यांना घरातूनच मिळाला. कथ्थक नृत्यात निपूण असलेल्या ‘महाराज’ परिवारात त्यांचा जन्म झाला. अच्छन महाराज म्हणजेच जगन्नाथ महाराज हे त्यांचे वडील. वयाच्या सातव्या वर्षांपासून ते वडिलांबरोबर अवधमधील दरबारात कथ्थक नृत्य सादर करत. वयाच्या तेराव्या वर्षी ते दिल्लीतील ‘संगीत भारती’ येथे कथ्थकचे धडे देत होते. कथ्थक जणू रक्तातच भिनले असावे इतक्या वेगाने त्यांनी या नृत्यशैलीत नैपुण्य मिळवले होते. वयाच्या नवव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले, मात्र प्रसिध्द कथ्थक नर्तक असलेले त्यांचे काका शंभू महाराज आणि लच्छु महाराज यांच्याकडे त्यांनी नृत्याचे  शिक्षण सुरूच ठेवले. भारतीय शास्त्रीय नृत्याचा चेहरा म्हणून ते नावारुपाला आले तेव्हा त्यांचे वय होते अवघे २८ वर्षे. याच वयात त्यांना संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

भारतीय नृत्याचा जागतिक चेहरा

पं. बिरजू महाराज यांनी लखनऊ घराण्याची वैशिष्टय़े मनापासून जपली. घराण्याने शिकवेले नृत्याचे तंत्र आणि त्यात स्वत:च्या संगीत, गायन, नृत्यादी अभ्यासातून केलेले प्रयोग या दोहोंचा अचूक मेळ त्यांनी साधला. त्यांची कल्पकता, त्यांचा अभ्यास यातून पारंपरिक कथ्थक नृत्यशैलीला चढवलेला नाविन्याचा साज अनेकांना त्यांच्या नृत्यशैलीकडे आकर्षित करता झाला. बंदिशीतून कथा सांगत, नृत्यातून त्याचे चित्ररुप उभे करणे ही त्यांची खासियत होती. अनेक देशांतून आपली नृत्यकला सादर करत त्यांनी कथ्थक नृत्य जगभरात लोकप्रिय केले. राधा.कृष्णाच्या पारंपरिक रचनांसह रोमियो.ज्युलिएटही त्यांनी नृत्यनाटय़ातून साकारले. पारंपरिक नृत्यशैलीतील निपुणता आणि प्रयोगशील स्वभावातून विकसित केलेली स्वत:ची अनोखी नृत्यशैली हा चमत्कार पंडित बिरजू महाराज यांनी स्वत: साधलाच , मात्र आपल्या शिष्यांनीही याचपध्दतीने परंपरा आणि नवता दोन्हींचा मेळ आपल्या नृत्यशैलीतून साधायला हवा हा आग्रह त्यांनी कायम जपला. काळानुसार कलेत बदल घडवत या बदलाचा चेहरा ठरलेले पंडित बिरजू महाराज यांच्यासारखे अतुलनीय व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही, अशीच भावना जगभरातून व्यक्त होत आहे.

कलेचा ज्ञानदान यज्ञ

पं. बिरजू महाराज यांचे नृत्य पाहून त्यांच्याकडे शिकण्याचा हट्ट धरला. नृत्याच्या उच्च शिक्षणासाठी मी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरल्यानंतर मला मुलाखतीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले. पं. बिरजू महाराज यांनी माझी मुलाखत घेतली होती. गुरू-शिष्य परंपरेनुसार दहा वर्षे मी त्यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. ‘नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज’ या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले होते. करोना काळात त्यांनी मला ऑनलाइन पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. हे माझे मोठे भाग्य होते. १५ दिवसांपूर्वीपर्यंत मी त्यांच्याकडे शिकत होतो. या दरम्यान शिकवण्यात आलेल्या बंदिशी या माझ्यासाठी अनमोल खजिना आहे.

पं. नंदकिशोर कपोते, ज्येष्ठ कथ्थक नृत्यकलाकार

या सम हा..

‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा’, असेच पं. बिरजू महाराज यांचे वर्णन करावे लागेल. कथ्थकच्या विश्वामध्ये त्यांच्यासारखा परिपूर्ण कलाकार यापुढे बघायला मिळणार नाही. त्यांच्या सादरीकणामध्ये विचारपूर्वक कलेचा आविष्कार दिसून येत असे. ज्येष्ठ शिष्या असल्याने मला त्यांचा खूप सहवास लाभला. कलाछाया संस्थेच्या पत्रकारनगर येथील केंद्राचे भूमिपूजन पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते झाले होते. तसेच संस्थेच्या नूतन वास्तूचे उदघाटन त्यांच्याच हस्ते झाले होते.

प्रभा मराठे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू

कथ्थकचे भगवान

पं. बिरजू महाराज हे कथ्थकचे भगवान आणि महान गुरू होते. सगळय़ांना त्यांनी आपलेसे केले आणि शिकवले. हातचे राखून काहीही ठेवले नाही. ते आयुष्यभर नृत्यातून प्रत्येकाला काही न काही देत आले. देशविदेशातील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले. प्रत्यक्ष कथक म्हणजेच मूर्तिमंतच ते असे वाटायचे. त्यांना एखादी गोष्ट आवडणे हे आमच्यासाठी पुरस्कारापेक्षा कमी नव्हते. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.

शमा भाटे, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू

लय-तालाशी सहज खेळ

प्रत्यक्ष गुरू नसले तरी अनेक कलाकारांनी पं. बिरजू महाराज यांच्याकडून ज्ञानकण वेचले. गायन, वादन, नृत्य, साहित्य, चित्र, शिल्प या सगळय़ा ललित कलांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचे मोठेपण त्यांच्या साधेपणातून सिद्ध होत असे. पुण्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. ज्या तयारीने ते कथ्थकचे तांत्रिक अंग करायचे, लय-तालाशी खेळायचे ते पाहण्यासारखे असायचे. ताल मांडणीतून त्यांचा भाबडा स्वभाव दिसून यायचा. पायांच्या आघातांमध्ये मधुरता होती. त्यातून त्यांचे वेगळेपण अधोरेखित व्हायचे. घुगरांच्या स्वरांचासुद्धा विचार करणाऱ्या या कलाकारांचे जाणे चटका लावणारे आहे.

 – मनीषा साठे, ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरू

कथ्थकला वेगळी उंची

कथ्थकच्या विश्वातील एक मोठे नाव म्हणजे पं. बिरजू महाराज. कथ्थकला वेगळय़ा उंचीवर पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. त्यांना संगीताची उत्तम जाण होती. त्याच्यावर प्रभुत्व होतं. त्यांनी कथ्थकला संगीताचा वेगळा रंग दिला. शास्त्रीय नृत्याला जगभरात नावलौकिक मिळवून देणाऱ्यांपैकी ते एक होते.

डॉ. सुचेता भिडेचापेकर, ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यगुरू

प्रत्यक्ष कथ्थकदर्शन

पं. बिरजू महाराज रंगमंचावर उभे राहिले तरी आपण संपूर्ण कथ्थकचे दर्शन घेत आहोत अशी अनुभूती प्रेक्षकांना यायची ही त्यांची ताकद होती. अनेक कार्यक्रमांमध्ये मी त्यांना तबल्याची साथ केली. त्यांच्यासोबत परदेशात जाण्याची संधी मिळाली. आपल्या सोबतच्या कलाकारांना ते आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक द्यायचे.

डॉ. अरिवदकुमार आझाद, ज्येष्ठ तबलावादक

नावीन्याचा ध्यास आणि बंदिशींच्या रचना

प्रचंड मेहनत, अभ्यास आणि कलेप्रति समर्पित वृत्तीने कार्यरत असलेले पंडित बिरजू महाराज यांनी केवळ आपल्या घराण्याचा वारसा जपण्यात धन्यता मानली नाही. त्यांनी हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला, वाढवला. ‘घराण्या’ने दिलेले संगीताचे शिक्षण हा तुमचा पाया आहे. त्यावर तुमच्या कल्पकतेने, सर्जनतेने नवे इमले चढवायला हवेत, असा त्यांचा आग्रह होता. नाविन्याचा ध्यास सतत त्यांच्या मनात असे. नर्तकाला वाद्ये, गायन या सगळय़ांची जाण असायला हवी असे ते म्हणत असत. त्यांनी स्वत: हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत शिकून घेतले. त्यांना लोकसंगीताचेही ज्ञान होते. शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतातील वाद्येही त्यांना वाजवता येत होती. त्यांनी स्वत: बंदिशी रचल्या. या बंदिशी ते स्वत: गात. त्यावर भाव आणि नृत्य अशी समग्र, लयबध्द गुंफण हे त्यांचे वैशिष्ठय ठरले. लखनऊ घराण्यातील नृत्यशैलीत अंग, लयकारी आणि अभिनय हे तीन घटक महत्वाचे असतात. या तिन्हीवर त्यांची पकड होती. मात्र केवळ पूर्वसुरींच्या बंदिशी आणि नृत्यरचनांचे सादरीकरण इथपर्यंत त्यांनी स्वत:ला मर्यादित ठेवले नाही. ‘बृजश्याम’ या नावाने त्यांनी त्यांच्या सांगीतिक रचना लिहिल्या. अवधी दरबारी नृत्यसादरीकरणाचा अनुभव गाठीशी असलेल्या बिरजू महाराज यांनी अनेक ठुमऱ्या, होरी, भजने रचली. त्यांच्या नृत्यशैलीत लखनवी लोकसंगीताचा बाज होता. त्यांच्या रचना, लयकारी ही सर्वसामान्यांपर्यंत सहजपणे पोहोचत असे.