केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीयांना एक आवाहन केलं आहे. मोदींचा आज ७१ वा वाढदिवस असून यानिमित्ताने मांडविया यांनी मोदींनी सर्वांना मोफत करोना लस देण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगतानाच आपण जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करुन घेत मोदींना वाढदिवसाची भेट देऊयात असं म्हटलं आहे. ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी असं केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त लसीकरण करुन घेण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. एका वृत्तानुसार आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त किमान ३० लाख जणांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दीष्ट भाजपाने डोळ्यासमोर ठेवलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> Birthday Special: सव्वा लाखांचं पेन, Apple गॅजेट्सबद्दलचं प्रेम अन् गॉगलची किंमत…; जाणून घ्या मोदींकडील महागड्या वस्तूंबद्दल

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मोदींच्या वाढदिवसाची लसीकरणाशी सांगड घालत एक ट्विट केलंय. चला आपण सारे भारतीय पंतप्रधान मोदींनी गिफ्ट देऊयात आणि लसीकरण करुन घेऊयात असं मांडविया म्हणाले आहेत. “चला लसीकरण सेवा करुयात आणि त्यांना (पंतप्रधान मोदींना) वाढदिवसाची भेट देऊयात. ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी,” असं मांडविया यांनी म्हटलं आहे. खरं तर मांडविया यांनी गुरुवारी दुपारीच हे आवाहन केलं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना त्यांच्या ओळखीतील, नातेवाईकांना आणि समाजातील सर्व घटकांना लसीकरणासाठी प्रेरणा द्यावी असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हॅशटॅग चर्चेत; मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘जुमला’दिवस’चीही चर्चा

आज लसीकरणाचा विक्रम करण्याचा भाजपाचा मानस असून मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये लसीकरणाला चालना देण्याचाही भाजपाचा प्रयत्न असणार आहे. आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची यादी पाहूयात…

> नमो अ‍ॅपवरुन व्हर्चूअल प्रदर्शन भरवण्यात येणार.

> पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना १४ कोटी रेशनच्या पिशव्यांचं वाटप करण्यात येणार. हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी वितरण केंद्रावर जाऊन सहभागी होतील.

> पक्षाचे कार्यकर्ते रक्तदान शिबिरांचे आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करतील

> पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रितनिधींना लसीकरण केंद्रांवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत.

> प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे.

> देशातील वेगवेगळ्या बागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पाच कोटी शुभेच्छापत्र पाठवली जाणार.

> २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कर्यक्रमांच्या यादीत एक विशेष कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलाय.

> गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

> नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरातील ७१ ठिकाणी नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.

> उत्तर प्रदेशमध्ये ७१ ठिकाणी गंगा स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे.

> अनाथ मुलांसाठी भाजपाकडून एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि महात्मा गांधींच्या जंयतीनिमित्ती विशे, कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Let us give him gift health minister vaccine push to mark pm modis birthday scsg
First published on: 17-09-2021 at 08:00 IST