लिबियाचे पंतप्रधान अली झेदान यांचे अतिरेक्यांनी त्रिपोली येथील एका हॉटेलातून गुरुवारी अपहरण केले होत़े  मात्र काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आल्याचे लिबियाचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद अब्देलाझीझ यांनी सांगितल़े  मात्र याबाबत कोणतीही अधिक माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केल़े
अल् कायदाचा संशयित अतिरेकी अबु अनास अल् लिबी याला अमेरिकेच्या कमांडोंनी परस्पर कारवाई करून, त्रिपोली येथून ताब्यात घेऊन युद्धनौकेवर नेल्याने लिबिया शासनामध्ये असंतोष होता़  या घटनेनंतर पाच दिवसांतच ही घटना घडल्याने यातील परस्पर संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आह़े
पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपोली येथील कोरिंथीया हॉटेलमध्ये पंतप्रधान राहिलेले असताना, अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्यांचे अपहरण केल़े  तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही मोठय़ा संख्येने बंदुकधारी हॉटेलात शिरल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आह़े  लिबिया शासनाने याबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, झेदान यांना अज्ञातस्थळी, अज्ञात कारणासाठी नेण्यात आले होते आणि त्यांचे अपहरण करणारे पूर्वाश्रमीचे बंडखोर असावेत़
लिबियातील बंडखोर गटांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे आणि सरकारी वकिलांच्या आदेशावरून शासनानेच त्यांना अटक केल्याचा आरोपही केला आह़े  कॅबिनेटने मात्र आपल्या फेसबुक पानावरून पंतप्रधानांविरुद्ध कोणताही अटक आदेश नसल्याचे स्पष्ट केले आह़े
लिबिया शासनाने ‘लिबिया रिव्हॉल्युशनरी’ आणि ‘ब्रिगेड फॉर द फाइट अगेन्स्ट क्राइम’ या दोन्ही क्रांतीकारक गटांवर संशय व्यक्त केला आह़े  दोन वर्षांपूर्वी गडाफी शासन उलथविणाऱ्या क्रांतीनंतर हे दोन्ही गट संरक्षण विभागांतर्गतच आणण्यात आल़े  मात्र ते अजूनही बऱ्याचदा स्वायत्ततेने काम करीत आहेत़