दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजविण्याचा रात्रीचा प्रतिबंधित काळ वाढविण्यास सर्वोच्च न्यायालायाने बुधवारी नकार दिला.
रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत फटाके वाजवण्यास २००१च्या आदेशानुसार बंदी आहे. मात्र त्यात वाढ करण्यासाठी आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना बुधवारी न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. फटाके घातक असून त्याचे दुष्परिणामही आहेत, मात्र त्याबाबत सरकारने जनजागृती केली नाही. फटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू व न्या. अरुण मिश्रा म्हणाले.

आवाज-वायू प्रदूषण यंदाही कायम..

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आवाज फाऊंडेशनने बुधवारी केलेल्या पाहणीत केवळ सुतळी बॉम्बचा अपवाद वगळता सर्व फटाक्यांचे आवाज मर्यादित पातळीखाली आढळले. मात्र एकाच वेळी फुटत असलेल्या हजारो फटाक्यांमुळे होत असलेले ध्वनी प्रदूषण व मंद आवाजांच्या फटाक्यांमुळेही होत असलेले हवा प्रदूषणाची समस्या मात्र या दिवाळीतही कायम राहील.
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनुसार चार मीटर दूर अंतरावरून मोजल्यावर फटाक्यांचा आवाज १२५ डेसीबल पातळीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या संख्येनुसार आवाजाची मर्यादाही कमी होणे गरजेचे आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत एकल व माळा स्वरुपातील बहुतांश फटाक्यांचे आवाज हे मर्यादित पातळीपेक्षा अधिक होते. मात्र वर्षांगणिक फटाक्यांच्या आवाजात घट होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही बुधवारी चेंबूर येथील मैदानावर १६ विविध प्रकारच्या व ब्रॅण्डच्या फटाक्यांची तपासणी झाली. त्यातील सोनी फायरवर्क्‍सच्या सुतळी बॉम्बने १२७ डेसीबलचा आवाज केला. माळा, एकल तसेच हवेत आतषबाजी करणाऱ्या इतर पंधरा फटाक्यांचा आवाज मर्यादित पातळीपेक्षा कमी होता. गेल्या काही वर्षांत होत असलेली जनजागृती तसेच प्रशासकीय पातळीवर कडक केलेले नियम यामुळे फटाक्यांचा आवाज कमी होत आहे. मात्र एकाच वेळी चहुबाजुंनी फुटणाऱ्या फटाक्यांमुळे आवाजाची पातळी मर्यादित पातळीपेक्षा अधिक होते हे वास्तव आहे.