कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रख्यात संत शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. संत शिवमूर्ती यांनी आपल्या मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मागील अनेक दिवसांपासून पीडित मुलींचं लैंगिक शोषण केलं जात होतं, असा आरोप एका स्वयंसेवी संस्थेनं केला आहे. पीडित मुलींच्या जबाबानंतर संत शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी शिवमूर्ती यांना अटक केल्याची माहितीही मिळाली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आल्यात समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संत शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्गा येथे निदर्शने सुरू झाली आहेत. दोन अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काल सायंकाळी वैद्यकीय चाचण्या पूर्ण होऊनही पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्याचबरोबर या घटनेला वाचा फोडणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात प्रवेश दिला नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

हेही वाचा- “रोहित पवारांचं काय होणार? हे…” मोहित कंबोजांच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, लिंगायत मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ‘ओदनदी सेवा संस्था’ या एनजीओशी संपर्क साधला होता. ही संस्था मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण झालेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींचा बचाव करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करते. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच या संस्थेनं ही बाब जिल्हा बालकल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- शिंदे-फडणवीस सरकार पडणार का? मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

तक्रारीनुसार, मुरुगा मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचे मागील साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. या प्रकरणी मठाच्या वसतिगृहाच्या वॉर्डनसह एकूण पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.