Sheikh Hasina : बांगलादेशात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या उठावानंतर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडला होता. तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला आहे. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता पहिल्यांदाच शेख हसीना यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘दिल्लीत आपण मुक्तपणे राहत आहे, पण घरी (बांगलादेशात) परतायला आवडेल’, असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. शेख हसीना यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या पक्षाला वगळून झालेल्या निवडणुकांनंतर देशात स्थापन झालेल्या कोणत्याही सरकारच्या नेतृत्वाखाली आपण बांगलादेशात परतणार नाही. तसेच सध्या तरी आपली भारतातच राहण्याची योजना असल्याचं हसीना यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर बांगलादेशात मुहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार स्थापन झालेलं आहे. आता मुहम्मद यूनुस यांनी बांगलादेशात फेब्रुवारी २०२६ मध्ये निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, शेख हसीना यांच्या पक्षावर घालण्यात आलेल्या बंदीवर हसीना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अवामी लीगवरील बंदी अन्याय्य कारक असल्याचं शेख हसीना यांनी म्हटलं आहे. लाखो लोक अवामी लीगला पाठिंबा देतात. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ते मतदान करणार नाहीत. जर तुम्हाला काम करणारी राजकीय व्यवस्था हवी असेल तर तुम्ही लाखो लोकांना मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, असं म्हणत शेख हसीना यांनी एक प्रकारे आगामी निवडणुकीत अवामी लीगला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाईल अशी आशा व्यक्त केली आहे.
शेख हसीना यांनी म्हटलं की, “आम्ही अवामी लीगच्या मतदारांना दुसऱ्या पक्षांना पाठिंबा देण्यास सांगत नाही. कारण आम्हाला अजूनही आशा आहे की सत्याचा विजय होईल आणि आम्हाला निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाईल.” दरम्यान, अवामी लीगला निवडणुकीत सहभागी होण्यासाठी परवानगी घेण्यासाठी शेख हसीना या स्वत: किंवा त्यांच्यावतीने इतर कोणी बांगलादेशी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे का? या मुद्यावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं आहे.
