गुवाहाटी : राष्ट्रवादी आणि जिहादी कारवायांसाठी वापर केला जात असल्याचा आरोप करून आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील एका मदरशावर स्थानिक रहिवाशांनीच बुलडोझर चालवला. हा मदरसा आणि त्याच्या शेजारील एका निवासस्थानावरही स्थानिकांनी कारवाई केली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

गोलपारा जिल्ह्यातील पाखिऊरा चार या ठिकाणी मातिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा मदरसा होता. हा मदरसा आणि त्याच्या जवळील निवासस्थानाचा वापर दोन बांगलादेशी नागरिक जिहादी कारवायांसाठी करत होते. मदरशाचा मौलवी जलालुद्दीन शेख याच्या अटकेनंतर या जागेचा देशविरोधी कारवायांसाठी वापर केल्याचे समोर आले. सध्या हे दोन बांगलादेशी नागरिक फरारी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

या मदरशाचा वापर देशविरोधी कारवाईसाठी केला जात असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी बुलडोझरच्या साहाय्याने हा मदरसा जमीनदोस्त केला.

आसाममध्ये आतापर्यंत पाडण्यात आलेला हा चौथा मदरसा आहे. स्थानिकांनी तीव्र संतापाच्या भरात पुढाकार घेत  हा मदरसा आणि त्याच्या बाजूचे निवासस्थान पाडले, असे पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरारी झालेल्या दोन बांगलादेशींची नावे अमिनुल इस्लाम ऊर्फ मेहदी हसन आणि जहांगीर आलोम अशी असून ते अल कायदाच्या अन्सारूल बांगला गटाचे दहशतवादी आहेत, असे पोलिसांनी सांगितले.