मेनका गांधी, अखिलेश यादव, दिग्विजय सिंह यांच्या भवितव्याचा निर्णय
लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यात रविवारी देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, हर्षवर्धन व मेनका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह व ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदानात होणार आहे.
रविवारी उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होत आहे. १०.१७ कोटी मतदार मतदानासाठी पात्र असून एकूण ९७९ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुका सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाने १.१३ लाखांहून अधिक मतदान केंद्रे उभारली आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यातील लक्षवेधी लढतीमुळे भोपाळ मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. राजधानी दिल्लीत भाजप, आप व काँग्रेस यांच्यात तिहेरी लढत होत आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप व डावी आघाडी हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. यंदा भाजपने तृणमूल काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.
भाजपसाठी कसोटी..
२०१४ साली भाजपने या ५९ पैकी ४५ जागा जिंकल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये येथील सर्वच पक्षांचे जोरदार प्रचारतंत्र पाहता भाजपसाठी या टप्प्यातील मतदान ही मोठी कसोटी असेल. गेल्या वेळी तृणमूल काँग्रेसने ८, काँग्रेसने २, तर समाजवादी पक्ष व लोकजनशक्ती पक्ष यांनी प्रत्येकी १ जागा जिंकली होती.