चौथा टप्पा : ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये सोमवारी देशभरातील नऊ राज्यांतील ७१ जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील या अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत.
राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, शिरूर आणि शिर्डी अशा १७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणुकीत ३३ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. एकूण एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३२ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल एक लाख ६६ हजार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
मावळ मतदारसंघातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादीचे पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे तसेच शिरूरमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे तसेच धुळ्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील तर पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आणि युतीचे राजेंद्र गावीत यांच्यात कोण बाजी मारणार याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.
चौथ्या टप्यात १० जागांवर शिवसेना, नऊ जागांवर काँग्रेस तर भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सात ठिकाणी रिंगणात असून मुंबई-ठाण्यावरील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान शांततेत पार पडले असले तरी चौथ्या टप्प्यात अनेक मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या लढती लक्षात घेऊन आयोगाने तब्बल ८७२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. यामध्ये सर्वाधिक २०२ मतदान केंद्रे ठाणे मतदारसंघातील असून कल्याणमध्ये १९५ तर भिवंडीत १७८ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान प्रक्रियेचे रेकॉर्डिगही केले जाणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली.
मुंबईत अटीतटीच्या लढती
मुंबईतील सहा मतदारसंघातून ११६ उमेदवार आपले राजकीय भाग्य अजमावत असून ईशान्य मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय पाटील आणि भाजपचे मनोज कोटक, दक्षिण मुंबईत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि शिवसेनेचे अरविंद सावंत, उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी तसेच उत्तर-मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यातील लढतींकडे मुंबईकरांच्या नजरा लागल्या आहेत.
देशात ७१ मतदारसंघांत मतदान
- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. त्यात सर्वाधिक १७ जागा महाराष्ट्रातील आहेत.
- त्याखालोखाल राजस्थान व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधील ८ जागांचा समावेश आहे.
- मध्य प्रदेश व ओडिशातील प्रत्येकी सहा जागांचा चौथ्या टप्प्यातील मतदानात समावेश आहे. बिहारमधील पाच व झारखंडमधील तीन तसेच जम्मू व काश्मीरमधील अनंतनागच्या (या मतदारसंघात तीन टप्प्यात मतदान) जागेचा समावेश आहे.
- मतदानातून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार, डिंपल यादव, बाबुल सुप्रियो राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवा यांचे भवितव्य निश्चित होईल.