नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात शनिवारी पंजाबमधील १३ जागांवर मतदान होणार असून कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या गैरहजेरीमुळे भाजपची पंचाईत झाली आहे. यावेळी भाजप सर्व जागा स्वबळावर लढवत असून जुना मित्र अकाली दलही सोबत राहिला नसल्याने केंद्रातील सत्ताधारी पक्ष एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले अनेक स्थानिक कार्यकर्ते निराश होऊन काँग्रेसमध्ये परत आले आहेत. कॅप्टनही भाजपमध्ये फारसे सक्रिय राहिलेले नाहीत. प्रकृती बिघडल्यामुळे ते संपूर्ण प्रचारात गैरहजर राहिले. गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील पहिल्या प्रचार सभेलाही अमरिंदर सिंग अनुपस्थित होते. कॅप्टन भाजपचे ‘पंचतारांकित प्रचारक’ असले तरी त्यांचा प्रचारात सहभाग नसल्याने राज्यभर पक्षाचा प्रचार करण्यासाठी तगड्या नेत्याअभावी भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजपला गावात प्रवेशबंदी
अमरिंदरसिंग यांच्या परंपरागत पटियाला मतदासंघातून त्यांची पत्नी व काँग्रेसच्या खासदार प्रिनीत कौर यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. कौर यांचा उमेदवारी अर्ज भरतानादेखील अमरिंदरसिंग येऊ शकले नाहीत. अमरिंदर सिंग यांच्या गैरहजेरीमुळे भाजप नेतृत्वहिन झाला असून शेतकऱ्यांचा वाढत्या रागाला सामोरे कोण जाणार हा प्रश्न प्रदेश भाजपच्या नेत्यांना सतावू लागला आहे. पटियालामध्ये प्रिनीत कौर यांना शेतकऱ्यांनी प्रचार करू दिला नाही. अनेक गावांमध्ये भाजपच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना प्रवेशही करू दिला गेला नाही.
हेही वाचा >>> युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”
शेतकऱ्यांचा राग नडणार?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न विचारता कृषी कायदे केले. त्याविरोधात वर्षभर आंदोलन केल्यानंतर कायदे मागे घेतले गेले पण, किमान आधारभूत किमती संदर्भातील कायदा केला नाही. मग, भाजप कशाच्या आधारावर मते मागत आहे, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
आपचा भ्रष्टाचार, ‘सीएए’ प्रचारातील मुद्दे
पंजाब शीखबहुल असल्यामुळे राम मंदिर वा हिंदुत्वाचा मुद्दा भाजपला उपस्थित करता येत नाही. त्यामुळे राज्यातील ‘आप’ सरकारची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, अरविंद केजरीवाल यांचा मद्याविक्री घोटाळ्यातील कथित सहभाग तसेच, ‘सीएए’ कायद्याला काँग्रेसने केलेला विरोध या मुद्द्यांभोवती भाजपचा प्रचार केंद्रित झाला आहे.
अनुकूल जागाही कठीण?
भाजपने २०१९ मध्ये गुरुदासपूर, होशियारपूर आणि अमृतसर या तीन जागा जिंकल्या होत्या. इथे ३७ टक्के हिंदू लोकसंख्या असून अकाली दलाची मदतही मिळाली होती. यावेळी अकाली दलाची मते मिळणार नाहीत. त्यामुळे अनुकूल मतदारसंघांमध्येही भाजपसमोर जिंकण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. उत्तर-पश्चिम दिल्लीतील विद्यामान खासदार हंसराज हंस यांना फिरोदकोट या राखीव मतदारसंघात पाठवले गेले आहे. अमृतसरमधून माजी राजदूत तरणजीत सिंह संधू समुंदरी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून आलेले रवनीतसिंग बिट्टू यांना लुधियानामधून तर ‘आप’मधून आलेले सुशीलकुमार यांना जालंधरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.