आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानात नवीन इनिंग सुरु केली आहे. भाजपातर्फे गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या गौतम गंभीर जोरदार प्रचारही करतोय. निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गौतम गंभीर दिल्लीतला सर्वात श्रीमंत उमेदवार ठरलेला आहे.
२०१७-१८ सालात गौतम गंभीरने आपल्या प्राप्तिकर परताव्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे १२.४० कोटी एवढं दाखवलं आहे. याचसोबत गौतम गंभीरची पत्नी नताशा गंभीरनेही आपलं वार्षिक उत्पन्न ६.१५ लाख इतकं दाखवलं आहे. याव्यतिरीक्त गौतम गंभीरच्या घरी ५ चारचाकी गाड्या तर एक दुचाकी गाडी आहे. प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेनुसार गंभीरच्या नावावर १४७ कोटींची संपत्ती आहे.
पश्चिम दिल्ली मतदारसंघातून निवडणुक लढवणारे काँग्रेसचे महाबली मिश्रा गौतम गंभीरनंतर दुसरे श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. मिश्रांची संपत्ती ही ४५ कोटींच्या घरात आहे. तर काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लढणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंहच्या नावावर १२.१४ कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे या लढतीत कोणते उमेदवार बाजी मारतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.