नवी दिल्ली : भाजपने वरुण गांधींना उत्तर प्रदेशातील पीलभीत मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर मंगळवारी काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाचा सांगावा धाडला आहे. त्यामुळे वरुण गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत तर्कवितर्क केला जात आहेत.

भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांना सुल्तानपूरमधून उमेदवारी दिल्यामुळे वरुण गांधी यांची राजकीय कोंडी झाल्याचे मानले जात आहे. पीलभीतमधून काँग्रेसचे माजी नेते जितीन प्रसाद यांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी वरुण गांधी यांनी या मतदासंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केल्याचे सांगितले जाते. मात्र, वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्याविरोधात उघड टीका केल्यामुळे उमेदवारी नाकारल्याचे समजते.

हेही वाचा >>> ‘त्या’ पोस्टवरून काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना भाजपाने घेरले, काय म्हणाले खासदार मनोज तिवारी?

भाजपने तिकीट नाकारले तर वरुण गांधी अपक्ष लढू शकतात असे मानले जात असले तरी, वरुण गांधी यांच्या गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही वा त्यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. पण, काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधी यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांच्या अमेठीतून लढण्याची चर्चा सुरू झाली आहे.

वरुण गांधी स्वच्छ प्रतिमेचे एक तगडे नेते आहेत आणि त्यांचे गांधी कुटुंबाशी नाते आहे. त्यामुळे भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले. मला वाटते की त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, ते आले तर आम्हाला आनंदच होईल, असे अधीर चौधरी म्हणाले. अधीररंजन यांच्या विधानावर गांधी कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली  नाही.

अमेठी, रायबरेलीबाबत निर्णय नाही उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत असून अमेठी व रायबरेली हे दोन्ही पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसला मिळाले आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी अमेठीमधून राहुल गांधी व रायबरेलीतून प्रियंका गांधी-वढेरा यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये उत्तर प्रदेशमधील पक्षाकडून लढवल्या जात असलेल्या १७ जागांवर चर्चा झाली असली तरी, या दोन मतदारसंघांतील उमेदवारांबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अमेठीतील संभाव्य उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये अमेठीमधून भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता.