आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी, टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरचे श्वान असल्याचे म्हटले आहे. मच्छलीपट्टणम येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते. ‘जगनमोहन रेड्डी हे श्वानाचे बिस्किट खात आहेत. हे बिस्किट ते आम्हाला वाटत आहेत. जगनमोहन आणि केसीआर हे मोदींच्या घरचे श्वान आहेत. जे एका बिस्किटासाठीही झुकतील. सावध रहा, जगनमोहन हे बिस्किट तुम्हालाही देण्याचा प्रयत्न करतील,’ असा टोलाही नायडू यांनी लगावला.
भाजपा आणि टीआरएसने वायएसआर काँग्रेसला निधी पुरवल्याचा आरोपही चंद्राबाबू नायडू यांनी केला. कोट्यवधी रुपये खर्च करुनही रेड्डींना मते मिळणार नसल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले,’मोदी आणि चंद्रशेखर राव यांनी १००० कोटी रुपये खर्च केले आहेत. चंद्रशेखर राव तुम्ही हे पैसे का खर्च केले? तुम्ही तुमच्या राज्यातील पैसा आंध्रमध्ये का खर्च करत आहात. १००० कोटी रुपये खर्च करुनही तुम्हाला एक मतही मिळणार नाही. आमचे लोक तुमच्यावर खूप नाराज आहेत. ‘
दरम्यान, ११ एप्रिलला आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.