Om Birla clarification unparliamentary words : असंसदीय शब्दांच्या यादीवरून सुरू झालेल्या वादावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संसदेकडून कोणत्याही शब्दावर बंदी आणली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच संसदेचा प्रत्येक सदस्य आपले मत मांडण्यासाठी मुक्त असल्याचेही ते म्हणाले.

शब्दांच्या वादावर ओम बिर्लांचे स्पष्टीकरण

”संसद सचिवालयाकडून कोणत्याही शब्दांवर बंदी घालण्यात आलेली नाही. संसदेचा प्रत्येक सदस्य आपले मत मांडण्यासाठी मुक्त आहे. संसदेत बोलणे हा प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही”, असे स्पष्टीकरण ओम बिर्ला यांच्याकडून देण्यात आले. पुढे बोलताना त्यांनी ”नागरिकांनी संसदेच्या कामकाजाची माहिती नसते, त्यामुळे त्यांच्याकडून अनेक प्रकारचे व्यक्तव्य केल्या जातात”, असेही ते म्हणाले.

काय आहे वाद?

जुमलाजीवी, हुकूमशहा, शकुनी, जयचंद, विनाश पुरुष, रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. या शब्दांची एक लांबलचक यादी तयार करण्यात आली होती. संसदेच कामकाज किंवा चर्चेदरम्यान हे शब्द वापरता येणार नाही, असे संसेच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे.

शब्दांच्या यादीवरून विरोधकांची टीका

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली होती. ”हा नवीन भारताचा नवीन शब्दकोष आहे”, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. ”सरकारच्या कामकाजाचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.”, असेही ते म्हणाले.

यासोबतच एमआयएम प्रमुख ओवेसी आणि आम आदमी पक्षाकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली होती.

हेही वाचा – असंसदीय शब्दांच्या यादीवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “हा नवीन भारताचा…”