जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागारांचे मत

नवी दिल्ली : करोनाच्या कोविड विषाणूचा प्रसार प्रदीर्घ काळ चालू राहील असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी पूनम खेतरपाल सिंग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, लशीमुळे व आधीच्या संसर्गामुळे समाजातील लोकांमध्ये प्रतिकारशक्तीची पातळी कितपत वाढली आहे त्यावर विषाणूचा प्रसार आटोक्यात येणे अवलंबून आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियातील प्रादेशिक सल्लागार असलेल्या पूनम खेतरपाल सिंग यांनी सांगितले की, विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, विषाणूने आपल्यावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे नाही.  साथ संपण्याचा टप्पा तेव्हा येईल जेव्हा लोक विषाणूबरोबर राहणे शिकतील. साथीच्या काळापेक्षा हे खूप अवघड आहे. ज्या लोकांमध्ये आधी संसर्ग जास्त प्रमाणावर होऊन गेला आहेव लसीकरण जास्त आहे त्या भागात विषाणूचा प्रभाव कमी राहणार आहे.

कोविड १९ विषाणू प्रदीर्घ काळ राहणार आहे. आगामी काळात विषाणू संपण्यासाठी अनेक घटक आवश्यक आहे. त्यातील प्रमुख घटक हा समाजाची प्रतिकारशक्ती हा आहे. ही प्रतिकारशक्ती मग लसीकरणातून आलेली असो की, आधीच्या संसर्गातून त्याचा प्रश्न नाही.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी वर्धक मात्रेचा वापर करण्याबाबत त्यांनी सांगितल ेकी, ज्या देशांमध्ये जास्त मृत्यू किंवा संसर्ग झाले आहेत तेथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लाखो लोक अजूनही लशीच्या प्रतीक्षेत आहेत.  त्यामुळे २०२१ अखेरीस जागतिक आरोग्य संघटनेने वर्धक मात्रेवर बंदी घातली आहे.

त्यामुळे प्रत्येक देशातील निदान ४० टक्के लोकांना लस मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी व जोखमीच्या लोकांचे  लसीकरण महत्त्वाचे आहे. सगळे जण सुरक्षित झाल्याशिवाय प्रत्येक जण सुरक्षित होणार नाही.

‘कोव्हॅक्सिनबाबत अभ्यास सुरू’ कोव्हॅक्सिन या लशीला आपत्कालीन मान्यता देण्याच्या मुद्दय़ावर त्यांनी सांगितले की,  भारत बायोटेकने या लशीबाबत जी कागदपत्रे दिली आहेत त्यांचा अभ्यास तंत्रज्ञ करीत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लशीला आपत्कालीन परवाना देण्याचा निर्णय घेतला जाईल.