उत्तर प्रदेशात भाजप सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. पण या सरकारकडून कोणतीही कामे होणार नाहीत हे जनतेला समजले आहे. भाजपला मते देणाऱ्या जनतेला आता पश्चाताप होत आहे, असे सांगून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला आहे. समाजवादी पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत. निवडणुका जवळ आल्या की कोणता न कोणता नवा ‘फॉर्म्युला’ ते घेऊन येतात. आमच्या सरकारच्या काळात आम्ही समाज हिताच्या योजना सुरू केल्या आणि भाजप सरकारने विकासाच्या योजना बंद केल्या, असे अखिलेश म्हणाले. राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारने समाजवादी पेन्शन योजना बंद केली. मेट्रो आम्ही सुरू केली आणि ते मात्र हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न असल्याचे सांगत आहेत. किरकोळ कर्जमाफी करून त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली, असा आरोपही त्यांनी केला.

गोरखपूरमधील रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरून अखिलेश यांनी योगी आदित्यनाथांवर निशाणा साधला. आपले मुख्यमंत्री गोरखपूरचे आहेत. पण तिथेच सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर प्रदेशातील राजकारण खूपच महत्त्वाचे आहे. आता आपण सरकारमध्ये नाहीत. जनतेने भाजपला भरभरून मते दिली. समाजवादी पक्षालाही दिली. पण सत्तेत येऊ शकलो नाहीत, असेही त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपला मते देणाऱ्या जनतेला आता पश्चाताप होत आहे. आपण कुणाला मते दिली याचा विचार मतदार करत आहेत. भाजप राज्यात कोणतीही विकासकामे करणार नाही हे त्यांना समजले आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lucknow akhilesh yadav attacks centre and up government samajwadi party state convention
First published on: 23-09-2017 at 13:52 IST