Premium

उज्जैन सप्तर्षी मूर्ती; सरकारसमोर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे आव्हान

उज्जैन येथील महाकाल लोक कॉरिडॉरमधील सप्तर्षीच्या मूर्ती कोसळल्याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारला भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे.

ujjain
उज्जैन सप्तर्षी मूर्ती; सरकारसमोर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे आव्हान

एक्सप्रेस वृत्तसेवा, भोपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उज्जैन येथील महाकाल लोक कॉरिडॉरमधील सप्तर्षीच्या मूर्ती कोसळल्याप्रकरणी मध्य प्रदेश सरकारला भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पथकाने मंगळवारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वीच फेटाळले आहेत.

सप्तर्षीच्या सात मूर्ती फायबरपासून तयार करण्यात आल्या होत्या. या निर्णयाचे या उपक्रमाचे मुख्य वास्तुविशारद आणि शिल्पकार कृष्ण मुरारी शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसह्णशी बोलताना समर्थन केले. ते म्हणाले की, देशभरात फायबरपासून मूर्ती तयार केल्या जातात. त्यामुळे खर्चात मोठय़ा प्रमाणात कपात होते. तसेच दगड, कास्य किंवा तांब्याच्या मूर्ती तयार करण्यासाठी अतिशय कुशल कारागीरांची गरज असते. आम्ही हा प्रकल्प हाती घेतला तेव्हा सर्व तांत्रिक तपासण्या पूर्ण केल्या होत्या.’

प्रकल्पाचे मुख्य शिल्पकार विजय पौडवाल यांनी तीन वर्षे या प्रकल्पावर काम केले आहे. त्यांनी प्रकल्पाच्या दर्जाचे आणि फायबरच्या वापराचे समर्थन केले. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना आपण सर्वात प्रगत साहित्य वापरले पाहिजे. फायबर हे विमान उद्योगासारख्या अतिशय उच्च तंत्रज्ञानाच्या उद्योगातदेखील वापरले जाते. ते वजनाला हलके असते. ते सहज हलवता येते आणि धातू व लाकडाच्या तुलनेत जास्त टिकते. धातू आणि लाकूड कालांतराने पावसाळय़ात खराब होते. आम्ही दगडाच्या मूर्ती तयार केल्या असत्या तर त्यासाठी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लागला असता आणि नियोजित निधीपेक्षा पाचपट अधिक खर्च आला असता.

शहर विकास आणि गृहनिर्माण खात्याचे मंत्री भूपेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषदेत असा दावा केला की शिल्पकला, मूर्ती बसवणे आणि इतर तांत्रिक बाबी काँग्रेस सरकारच्या काळातच पूर्ण झाल्या होत्या. ते म्हणाले की, आम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. काँग्रेस गलिच्छ राजकारण करत आहे. त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही पुरावा दिलेला नाहीह्ण. लोकांच्या धार्मिक भावना दुखावू नका असे आवाहनही त्यांनी केले.

मात्र, उज्जैनला भेट देणाऱ्या काँग्रेसच्या पथकातील एक सदस्य के के मिश्रा यांनी भूपेंद्र सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. स्वत:च्या पापांचा दोष काँग्रेसला देणे हा या सरकारचा वेळ घालवण्याचा उद्योग आहे अशी टीका त्यांनी केली.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्यापूर्वी एक आठवडा आधी उज्जैनमधील काँग्रेस आमदार महेश परमार यांनी मध्य प्रदेश लोकायुक्तांना भेटून या प्रकल्पात आर्थिक अनियमिततेचे आरोप केले होते. या कॉरिडॉरची लांबी ९०० मीटर असून त्यामध्ये १०८ नक्षीदार खांब आहेत. तसेच शिव-पार्वतीच्या २०० मूर्ती आणि इतर कलाकृती आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 01:34 IST
Next Story
दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठय़ाचा संशय; एनआयएचे देशभरात छापे